साऱ्या जगाचे लक्ष नाशिक शहराने कायमचे वेधून घेतलेले आहे. सह्याद्री डोंगररांगाच्या कुशीत वसलेलं नाशिक. पश्चिम भारताच्या ह्रदयस्थानातील अध्यात्मिक महती व ऐतिहासिक पाळेमुळे असण्यापासून आजच्या काळात ज्या शहराकडे अवगत तंत्रज्ञान, जागतिक व्यापार केंद्र, वैज्ञानिक संशोधन, उद्योगनगरी, आयटीहब म्हणून अनेकांचे स्वप्न साकार करणारे ठिकाण म्हणून ओळख मिळत चाललेलं शहर म्हणजेच ‘नाशिक’ पूर्वीसारखी मंदिराची भूमी, तपभूमी, मंत्रभूमी ही ओळख कणभर ही पुसू न देता या शहराने जगाच्या नकाशावर स्वतंत्र अस्तित्व अगदी ठळकपणे निर्माण केले. १९९१ नंतर भारतात जागतिकीकरण सुरू झाले. तेव्हापासूनच नाशिक शहरात अनेक बड्या उद्योगांची, औषधनिर्माण, संशोधन तसेच नावाजलेल्या शिक्षणसंस्थांनी आपले स्थान पक्के करायला सुरूवात केली होती. नाशिक सातत्याने विकसित होत चालले आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थित्यंतरे या शहरात गेल्या काही दशकांत आपल्याला बघायला मिळाली आहेत.
आरोग्य, दर्जात्मक जीवनशैली, आदरातिथ्य व पर्यटन, शैक्षणिक संकुल, उद्योग, संरक्षण, जैविक उर्जा, या सर्वच क्षेत्रात नाशिकने विकसित होण्याची कास धरल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. संरक्षण क्षेत्राबाबत सांगायचे झाल्यास राष्ट्रीय सुरक्षेच्यासाठी नाशिकचा पुढाकार असलेला आपल्याला दिसून येईल. यासाठी नाशिकच्या देवळाली व ओझर भागाचा सगळ्यात मोठा वाटा राहिला आहे. सैनिकी शिक्षणापासून ते संरक्षणाबद्दलच्या शस्त्रास्त्र, युध्दशास्त्र यासंबंधी नाशिकचा देवळाली कँटोन्मेंट किंवा देवळाली रेजिमेंट येथे मोठ केंद्र उभारण्यात आलेले आहे. नाशिक आर्टीलरी सेंटरही नाशिकरोड भागात आहे. देवळाली छावणी ही भारतीय सैन्याची क्रमांक दोनची सक्षम, तसेच बलशाली बाहू म्हणून ओळखली जाते. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही नाशिकच्या ओझर भागात स्थित भारतीय वायु दलासाठी विमाने तयार करणारी कंपनी आहे. येथे मिग २७, मिग २१ तसेच सुखोई ३० या विमानांचे उत्पादन करणारा कारखाना आहे. ओझरच्या एचएएल कारखान्यात तयार होणारी विमाने भारतीय वायुदलात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करतात. भारतीय संरक्षण दलाचे बलशालीकरण करण्यात नाशिकने कायमच अत्यंत सक्षम बाजू सांभाळली आहे.
जगासाठी पुढील डिजीटल लोकेशन म्हणूनही नाशिक आपली नवीन ओळख तयार करते आहे. उद्योगनगरी नाशिक हे या शहराचे अतिशय समर्पक असे वर्णन होईल. आल्हाददायक वातावरण अद्ययावत सोयीसुविधा असल्याने नाशिककडे उद्योगविश्वाचा ओढा सातत्याने वाढतच राहिला आहे. निर्मितीप्रकल्प उभारणी करण्यासाठी उद्योगजगताची पहिली पसंती ही नाशिकलाच देण्यात येते.
भारताचे स्वयंपाकगृह म्हणूनही नाशिकला कायम संबोधण्यात येते. नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा आहे. भाज्या, फळे, फुले, कडधान्ये, दूध, मांस, अंडी, पशुखाद्य या सगळ्यांच्याच उत्पादनात नाशिक अग्रेसर आहे. संपूर्ण भारतात शेतीतून सर्वाधिक दरडोई उत्पन्न घेण्यात नाशिकला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. पारंपरिक शेतीसह आजच्या काळातील शेतीसंशोधनावर नाशिक शहराचा भर राहिला आहे. त्यातील निष्कर्षानुसार नाशिकचे शेती तंत्रज्ञान सुजलाम सुफलाम बनले आहे.
जैवतंत्रज्ञान या विषयाकडे जेव्हा आपण बघतो, तेव्हाही संशोधनाकरिता नाशिक शहराला पर्याय नाही हेच सिध्द होते. उती, तसेच रक्त तपासणीसाठीच्या लिक्विड बायोप्सी इन इनसाक्लोपेडिक मॅनर करणाऱ्या प्रयोगशाळाही नाशिक शहरात उभारण्यात आल्या आहेत. डॉ. अश्विनी घैसास यांनी दिलेल्या माहितीनुसार एनएबीएल, आयएसओ, कॅब अक्रेडिटेड प्रयोगशाळाही नाशिक शहरात उभारली गेली आहे. भारतातील सर्वप्रथम क्लिआ अक्रेडिटेड लॅब नाशिक शहरातच सुरू झाली आहे. जिथे लंडन, कॅनडा, आखाती- आशियाई देशांतून रक्ताचे नमुने तपासणीसाठी येत असतात.
जगभरातील ग्राहकांना सेवा पुरवणाऱ्या केपीओ केंद्राचीही स्थापना नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. नाशिक हे वाहनक्षेत्राच्या संशोधन व विकासासाठी उद्योजकांच्या मनात वसलेले शहर आहे. रोबोटीक्स इन ऑटोमेशन चा आधार घेत अत्यंत अनोख्या उपकरणाची स्थापना नाशिकमध्ये उद्योजक प्रितीश चंद्रात्रे यांनी केली. त्यांच्या रिदमसॉफ्ट कंपनीने भारतात सर्वप्रथम नाशिक शहरातच हे तंत्रज्ञान विकसित केले. आता ते आशियाई व युरोप देशांनाही हे पुरवत आहेत. संपूर्णपणे निर्मिती झालेल्या यंत्रांचा यात समावेश आहे. जगभरात सध्या ज्यांची अधिक चलती सुरू आहे त्या इलेक्ट्रिक वाहनांचे शाश्वत संशोधनाचे डेस्टिनेशनही नाशिकच ठरले आहे.
नवनवीन गेम्स हब म्हणूनही आता नाशिक विकसित होऊ पाहत आहे. नाशकातील युवक उर्जाचा सध्याच्या घडीला ई-स्पोर्ट तंत्रज्ञान बनवण्याकडे कल वाढतो आहे. ज्याचे समर्थन सरकारी क्रीडामंडळेही करत असतात.
वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून नाशिक शहराची ओळख आता जगासाठी नवीन नाही. आधीपासूनच द्राक्ष उत्पादनात शहर अग्रेसर राहिले आहे. आता वाढणाऱ्या विनियार्ड्स नाशिकला नवीन झळाळी देत आहेत.
लॉजिस्टिक व साठवणूक(वेअरहाऊसींग) क्षेत्रातही नाशिक आघाडीवर आहे. मुंबई व पुण्याला गोल्डन हार्टने जोडले गेल्यानंतर रस्ते वाहतूक, दळणवळण नाशिकला अत्यंत सोपी झाली. आयटी हब ची संख्या मुंबई- पुण्यात भरमसाठ वाढली. व आता त्या दोन्ही शहरांची सामावून घेण्याच्या क्षमतेवर अधिक भार होऊ लागला आहे. तेव्हाच नाशिकची पुढील आयटी हब म्हणून विकसित होण्याचे संकेत मिळत गेले, आता ते खरेही ठरत आहेत. WINJIT चे सहसंस्थापक अभिजीत जुनागडे यांच्याकडे सध्या जगभरातील लोकांना सेवा ते पुरवत असल्याचे सांगतात. तसेच आता त्यांच्या कंपनीच्या काही शाखा विदेशातही उभारल्या गेल्या आहेत. मशीन लर्निंग, कृत्रीम बुध्दिमत्ता, आयओटी प्रॉडक्ट्स, या सर्व गोष्टींना जगात पोहोचवण्यासाठीचे मार्केटिंग हेडक्वार्टर हे नाशिक बनलेले आहे.
बायोटेक्नॉलॉजी – यासाठीचे भारतातील सर्वोत्तम संशोधन केंद्र म्हणून नाशिक एक उज्वल ओळख निर्माण करते आहे. पहिल्यापासूनच नाशिकचे वातावरण जैविक संशोधनासाठी अनुकूल ठरल्याची ग्वाही देशभरातली शास्त्रज्ञ देत आले आहेत.
तंत्रज्ञान विकसित होण्याच्यासाठी म्हणून नाशिक दिवसेंदिवस प्रगतीपथावर घौडदौड करत मजल मारते आहे. जमिनीच्या आवाक्यात असणाऱ्या किंमतीमुळे अनेकजणांना आकृष्ट करण्याची क्षमता शहरात आहे. इतर शहरांच्या तुलनेत कमी शुल्कात कौशल्य व प्रतिभासंपन्न मनुष्यबळ इथे सहज उपलब्ध होते आहे. तसेच संशोधन व विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे शांत वातावरणही नाशिक शहरात हमखास मिळते, याच कारणाने नाशकात येण्याकडे अनेकांचा ओढा असतो.
वाहतूक व दळणवळण संदर्भात विचार करायचा झाल्यास मुंबई, पुणे, नंतर विकसित होऊ पाहणारे तिसरे मोठे शहर म्हणून नाशिकचाच विचार केला जातो आहे. नाशिकला सध्या ओझर व शिर्डी अशी विमानतळे कार्यरत आहेत. एवढं कमी वाटलं तर नाशिकच्या गंगापूर धरणावरून सीप्लेन ही भरारी घेत जाते. याचमुळे यापुढे जी प्रगती देशात होणार आहे त्यात नाशिक शहराच्या प्रगतीचा डंका मुंबई, पुण्याहून जास्तच असणार हा विश्वास नाशिकचे पालकमंत्री, राज्याचे अन्न व नागरी प्रशासन मंत्री ना. छगनरावजी भुजबळ यांनाही वाटतो.
अत्यंत सूचक, योग्य, तार्किक नियोजनबध्द शहर म्हणून नाशिककडे पाहण्यात येते. रस्तेबांधणीतही भविष्यकालीन गरजांना परिपूर्ण करण्यात अव्वल ठरणारे असे नाशिक शहर असणार आहे. रस्ता, रेल्वे, वायुमार्ग या सर्व मार्गांनी नाशिक भारतातील प्रत्येक मोठ्या व महत्त्वाच्या शहरांना जोडले गेलेले आहे. भारतासाठी तसेच जगासाठीही नाशिकमध्येच अनन्यसाधारण भविष्य दडलेले आहे.
जमिनीतील उर्जासाठा संपत चालला आहे. त्यामुळेच सौरउर्जा, वायुउर्जा, जलविद्युत, औष्णिक विद्युत प्रकल्प, यासोबतच नाशिकमध्ये घनकचरा निर्मुलन हे विद्युत उर्जेत करणारे केंद्रही विल्होळी येथे उभे राहिले आहेत. यात हॉटेल्स तसेच इतर मोठे कारखाने, यंत्रणांकडून येणाऱ्या घनकचऱ्यातून विद्युतउर्जा निर्माण करण्यात येते.
उच्च व तंत्रशिक्षणासाठीही नाशिक अग्रेसर आहे. विद्यासंपन्न शिक्षणसंस्थांनी नाशिकचा शैक्षणिक आवाका गजबजलेला आहे. व्हर्चुअल क्लासरूम्स द्वारेही नाशिक शहरात शिक्षण देणारी यंत्रणा इथे उभारण्यात गेली आहे. ज्याद्वारे जगभरातून शिक्षक व विद्यार्थी ज्ञानाची आदान-प्रदान करत असतात. रोबोटिक अँजिओप्लास्टी, टेलिमेडिसीन, ग्रीन कॉरिडोर अत्यंत शिस्तबध्द व काटेकोरपणे पालन करत असल्याचे उदाहरणे नाशिक शहराने वेळोवेळी लक्षात आणून दिली आहेत.
आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत अनेक मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पीटल्स नाशकात आता सुसज्ज आहेत. दक्षिण आशियाई देश. युरोपात द्वितीय, जगात दहावे तर महाराष्ट्रात प्रथम रोबोटिक आर्म अँजिओप्लास्टी केंद्र नाशिकमध्ये सुरू झाले असल्याची माहिती विख्यात ह्रदयरोगतज्ज्ञ शल्यविशारद डॉ.मनोज चोपडा हे देतात. जगभरातील डॉक्टरांना इंटरनेटद्वारे जोडून तेथील रूग्णांवरही नाशिकचे डॉक्टर सल्लामसलत, तसेच शस्त्रक्रिया सहाय्य करत आहेत. ग्रीन कॉरिडॉअर यशस्वीपणे राबवण्यात नाशिक शहर कायमच उजवे ठरत आहे. त्यामुळे यकृत, किडनी, ह्रदय प्रत्यारोपणासाठी वेगवान यंत्रणा तात्काळा कार्यन्वित केली जाते. सुधारलेली आरोग्ययंत्रणा, प्रदूषणमुक्त शहर परिसर यामुळे नाशिक राहण्याच्यादृष्टीने लोकांना अधिक भावते.
जीवनमान दीर्घपणे उंचावण्यातही हे शहर विख्यात होत आहे.
स्वच्छ, सुंदर वातावरण नाशिकला देण्यात कचरा व्यवस्थापन करण्याची मोठी कार्यप्रणाली कारणीभूत ठरल्याची शाश्वती महापालिका आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे देतात. शहरातील नागरिकांनी योग्य ते सहकार्य दिले असल्याची पुष्टीही त्यांनी दिली. १७ लाख जनसंख्येकडून कचरा गोळा केला जातो. घराघरातून हे संकलन होते. २१७ जीपीएस सुसज्ज घंटागाड्या यासाठी धावतात. प्रॉपर सायंटिफिक डिसपोजल ऑफ इनर वेस्ट साठी सांयटिफिक लँडफिल साईट ही विकसित करण्यात येत असल्याची माहिती महापालिका अभियंता नितेश कुमार त्रिपाठी हे देतात.
योगाभ्यास करण्यासाठी लाखो लोक जगभरातून नाशिक येथे येत असतात. ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व, विकासाचा ध्यास म्हणून नाशिक हे सर्वाधिक आवडीचे ठिकाण ठरत आहे, हे निर्विवादच.
भविष्यकाल उज्वल करण्यासाठी नाशिक आता स्मार्ट सिटी म्हणूनही उभे राहत आहे. स्मार्ट रोड आधीच तयार झालेला आहे. भूमिगत केबल्स, स्वतंत्र ड्रेनेज व रेन वॉटर हार्वेस्टिंग आता वायफाय, अपात्कालीन दूरध्वनी केंद्र,एलईडी प्रकाश, टेलिकॉम अँटीना, सीसीटीव्ही, उद्घोषणा केंद्र, इनव्हायरमेंटल सेन्सर यासारख्या सुविधांनी सज्ज असा स्मार्ट पोल शहरात आकाराला येत आहेत.
ड्रोन कॅमेरा, जीपीएसने नाशिक याआधीच अचूकपणे टिपण्यात आले आहे. त्या नकाशांचा उपयोग अत्यंत प्रभावशाली पध्दतीने विकासकामांत होत आहे. कमांड अँड कंट्रोल यंत्रणेद्वारे अनेक सायबर पोलीस स्टेशन नाशकाच्या सुक्षेत भर घालतात. अपात्कालीन वेळेत महिलांना सुरक्षा देता यावी म्हणून १०९१ हा क्रमांकही कार्यन्वित केला गेला असल्याचे तसेच दोन व्हॉट्सअप क्रमांकही नाशिककरांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपयोगात आणले जात असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. इतकं सगळं असल्यामुळे नाशिक हेच भविष्य मानणाऱ्या लोकांची संख्या वाढतच जाणार यात कोणालाच शंका येणार नाही.
© विशाल लोणारी, २०२०
एक अभ्यासू बाजू मांडली आहे सर आपण. खूप खूप धन्यवाद!!
उत्तर द्याहटवा