प्रेम. दोन मनांना जुळवणारी एक अलवार भावना. सोशल मीडिया अन मोबाईल आल्यापासून माणसे एकमेकांशी पटकन जोडली जातात. पण, त्यांची मनं मात्र जुळतातच असे नाही. मग, त्यांच्यात फक्त सुसंवाद घडू शकतो. एकमेकांची काळजी केली जाऊ शकते, मात्र ते प्रेमापोटीच असेल असे नाही. दोन व्यक्तींचे एकमेकांवर प्रेम जडण्यासाठी त्यांच्या काही गोष्टींत साम्य असावे लागते, तर काही या वेगळ्या असायला लागतात. याहीपलिकडे प्रेम हे सहवासातून जास्त निर्माण होत जाते. त्यात आभास कमी अन वास्तवातल्याही भेटी-गाठी जास्त व्हायला लागतात. तेव्हाच निखळ प्रेम दोन ह्रदयांत भावनांच्या रूपाने जन्म घेते. खरंतर भावनाशून्य व्यक्तीही कधीकधी प्रेमात पडू शकते. इतकी आकृष्ट करण्याची ताकद या नाजूक भावनेत आहे. आज हे सांगण्याचे कारण म्हणजे, नुकतंच वाचलेलं एक पुस्तक, “मेसेज बॉक्स” शंतनु गोटे या तरूण लेखकाने ही दीर्घकथा लिहिली आहे. तर, नभ प्रकाशन तिचे पुस्तकरूपात प्रकाशन करणार आहेत. मोबाईलवर आलेला एक एसएमएस कशाप्रकारे निहालचे आयुष्य बदलून टाकतो. अन, स्वराचे प्रेम मिळवण्यासाठी आंधळेपणाने धडपडणारा निहाल कसे स्वतःचे आयुष्याला कलाटणी देत यशाचा मार्ग गाठतो या प्रश्नांची उत्तरे देणारी सुरस कथा म्हणजेच ‘मेसेज बॉक्स’. यातील मुख्य पात्रे निहाल, स्वरा यांच्याभोवतीच ही कथा फिरते.
शाळेत असताना वह्यांच्या कोऱ्या पानांवर उमटलेली प्रेमाची अडीच अक्षरे, तारूण्यात प्रवेश करेपर्यंत मोबाईलच्या स्क्रीनवर झळकू लागतात. त्यानंतर निहालचा आपल्या एकतर्फी प्रेमाला धडपड करत मिळवण्याच्या प्रयत्नाला सुरूवात होते. तेव्हा निहाल अनेक कसोट्यांना सामोरा जातो. काळाच्या ओघात निहाल अन स्वरा दोघेही एकमेकांचे घनिष्ट मित्र मात्र नक्कीच होतात. पण, एकेदिवशी अचानक निहालला स्वराचा निरोप मिळतो. तिचे दुसऱ्याच कुणा मुलावर प्रेम जडते. त्यानंतर निहाल मात्र आयुष्याला धैर्याने सामोरा जातो. तो काय निर्णय घेतो, अन एका एसएमएसमुळे स्वरा निहालच्या आयुष्याची हेलकावणारी नाव कशाप्रकारे किनाऱ्याला नेते, याची उत्प्रेक्षा म्हणजे ‘मेसेज बॉक्स’ हे पुस्तक.
लेखक शंतनू गोटे याने लहान वयातच हे पुस्तक लिहीले आहे. आंधळ्या प्रेमाची गोष्ट लिहून त्याने त्याच्या व पुढच्या पिढीला डोळस संदेशच दिला आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवा पिढीला तर ही गोष्ट आकृष्ट करेलच. परंतु, ज्येष्ठांनीही तिचा आस्वाद घेण्यास हरकत नाही. काहीसी खऱ्या अनुभवांवर आधारित ही गोष्ट फिल्मी वाटत असली तरी अगदी लहान वयातच जिथे नवी पिढी पुस्तक वाचनाला टाळू लागल्याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते तिथे स्वतः पुस्तक लिहीण्याचे धाडस खरोखर कौतुकास्पदच म्हणावे लागेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा