आमच्या इथं सातपूर एमआयडीसीत छानसे एकमजली हॉटेल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मिसळीसाठी नाशकात एकदम वर्ल्डफेमस आहे. मिसळ म्हणजे माझा जीव की प्राण यावर माझं खूप वेळा बोलून झालं आहे. तरीही, मिसळला ओव्हररेटेड म्हणणारे पण अपल्या पुढ्यात नांगी टाकतील एवढं भडभडून मिसळीबद्दल बोलत बसायला माझ्याकडे वेळ नाही. तेवढ्या वेळात मी एक मिसळ फस्त करेल, एक्स्ट्रा १२ पावांसोबत.
 |
Pic credit - Internet |
खरेतर मिसळ हे श्रमिकांचे खाद्य आहे. एमआयडीसीत काम करणारा, कष्ट करणाऱ्या कामगाराला पोटभर जेवू घालणारा वडापाव, पाववडासोबत मिसळचाच क्रमांक येतो. परंतु, इथली मिसळ याच्या पलीकडे कधीच जाऊन पोहोचली आहे. आज खाल्ली तेव्हा पावाची साईज मागच्यावेळेपेक्षा जरा बारकी वाटली,पण चव ? अहाहा चव अशी की तिला पाहून कलेजा खल्लास झाला. तोंडाला सुटलेलं पाणी मग पुढे नाकातून खाली ओघळायला लागते, ते तुम्ही ओढून साफ करत नाही
तोच(नाकच ओढता का ? रूमालपण नाकाखालून ओढला जातोच) टाळूवरून एक थेंब हळूहळू गळायला लागलेला असतो, तेव्हा समजायचं की मिसळ अगदी योग्य प्रमाणात रस्सेदार, झणझणीत आहे. योग्यतेपेक्षा अधिक झणझणीत मिसळी पण मी तितक्याच लज्जतेने फस्त केल्यात. मात्र, योग्य प्रमाण पण मला योग्य वाटते. इतर अनेक जणांचे मत माझ्याप्रमाणेच असावे. आणखीन एक वैशिष्ट्य मी याआधी कधी सांगितलं नसेल म्हणून बोलतो. इथं’भाऊ रस्सा आण रे ! अशी हारोळी, साद, हाक मारायची गरज पडत नाही. मोठी स्टील बाऊल, पेला भरून तुम्हाला रस्सी, तर्री देऊन टाकली जाते, उकळलेल्या त्या रश्याला पाहून पोटातील रसायने पण उकळ्या मारायला लागतात. आतडी आळस बिळस झटकून मोकळे होतात. पिवळीधम्म मोठ्या आकाराची शेव हे पण इथल्या मिसळीचे वैशिष्ट्य आहे. ही शेव त्या नूडल्ससोबत येते तशी नसते कुरकुरीत वगैरे. याउलट मिसळीला आवश्यक असणारीच चुरमुरीतपणा या शेवेत जाणवतो. याचमुळे इथे लांबून लांबून लोक मिसळीसोबत अनेक आनंदसोहळे साजरे करायला येतात. तृप्ततेची ढेकर देऊन, मिसळ खाल्याचे समाधान व्यक्त करतात. काही ते बोलून सांगू शकत नाही तर असे लिहितात.
मी सहसा नव्या कुठल्या माणसाला भेटतो तर मिसळ खायचेच निमित्त ठरवायला बघतो. अनेकांना तो एका येडाधडाचा चाभरट अगोचरपण वाटत असेल. नाशिकमधल्या कुणाही माणसातील, विशेषतः त्याच्यातील सृजनात्मकता, संवेदनशीलता, निर्मळता जाणून घ्यायची असेल तर त्याच्या सोबत मिसळ खा ! तेव्हा त्याच्याशी ओळख करून घ्या. बिनधास्त. तसेही, मिसळ खायला ओळख वगैरे लागतेच ही अंधश्रद्धाच झाली म्हणा. बघा, त्या व्यक्तीशी चांगला कायमचा जिव्हाळा निर्माण होऊन बसेल. तर, अशी ही पुरेपूर प्रेमापूर देणारी मिसळ असते, ती नाशकात वर्ल्डफेमस असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा