प्रेम नाव आहे फिल्म चं...दुसरं प्रेम💡🎥🎞
दुसरं प्रेम नावाची शॉर्टफिल्म बघण्यात आली. दोन आठवडे झाले असतील. ती बघितल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मला पूर्णवेळ डोक्यात तीच फिल्म फिरत राहिली. म्हणजे त्यातील प्रसंग विचारप्रवाहात सतत आदळत होते. याला कारण त्या शॉर्टफिल्मची नाटकीय कलाटणी देणारी अखेर. त्यामुळे माझ्या मनाला घनघोर निराशा फेर धरून राहिली होती. त्यामुळे त्या परिस्थितीत लिहायला बसलो असतो तर सगळी नकारात्मकतेची मळमळ ओकून मोकळा झालो असतो. म्हणूनच, लिहिणं टाळून दिले. त्या विचारांना सोडून दिले. संपृक्तता झाली नसल्याचे जाणवले होते. कदाचित माझी ती प्रक्रिया थोडी मंदावली होती. म्हणून फार धीराने घेतल्यावर फावला वेळ लाभल्याने आता लिहायला घेतोय.
बऱ्याचदा असं होतं, की फेसबुक स्क्रोलिंग सुरू असते. अन, अशात एक तरूण ज्याचा आयुष्यात फार गोंधळ उडाला आहे. अन, एक अतिशय सुंदर अन समंजस मुलगी यांचा एक व्हिडिओ आपल्या समोर येतो. त्याला कॅप्शन 'अशी समजूतदार बायको मिळायला हवी' असे असते. तेव्हा उत्सुकतेने आपण तो व्हिडीओ बघतो. आपल्या साकळत चाललेल्या एकल्यपणाची आंतरिक जळजळीवर मलम लावायचा म्हणून असे व्हिडीओ आजकालच्या तरूणांची फार मदत करतात. तो व्हिडिओ मला आवडला, त्यातील कलाकारांचा अभिनयही सुंदर होता. अन, आशयगर्भ असा तो प्रकार होता. तो इतका भावला की मी तो व्हिडीओ बनवणारा चॅनेल युट्युबर शोधून काढला. अन, बघितलं तर काय ! हा व्हिडीओ एकटा नव्हता तर ती एक ४ व्हिडिओ असलेली सिरीजच होती. मोबाईलच्या घड्याळात बघितलं, दोन वाजले होते. अर्थात मध्यरात्र उलटून गेली होती. अन, इतक्या रात्रीपर्यंत जागल्यावर लवकर झोप येणार नव्हती. मग, काय चारही भाग बघून टाकायचं ठरवलं.

पहिला भाग अतिशय नाट्यमय रोमँटिक, दुसरा भाग ड्रॅमाटिक फ्लॅशबॅक, तिसरा भाग एक्झरेगेटिव्ह मेलोड्रामा, अन अखेरचा भाग म्हणजे ट्रेजेडीकल ट्विस्ट असलेला होता. यामध्ये दोन अभिनेत्री आहेत. एक असते पहिलं प्रेम दुसरी असते दुसरं प्रेम. त्यातील जो नायक आहे. त्याची या दोघींमध्ये तरफड, ओढाताण, पळता भुई थोडी वाट असे सगळं होतं. नायकाचा पालुपदी मित्र त्याला समजून घेत योग्य वाट दाखवत जातो. अन या सगळ्यांत नायकाचा बॉस त्याला धारेवर धरत नाचवत राहतो. असा सगळा मालमसाला ठासून भरलेली ही सिरीज असलेली शॉर्टफिल्म आहे.
चारही एपिसोड पाहताना आपल्याला आनंद होतो, दुःख, चीड, राग, हासू, अन नैराश्य हे सगळं काही अनुभवता येतं. म्हणूनच ही शॉर्टफिल्म जरी असली तरीही त्यातून निव्वळ सामाजिक संदेश वगैरे न दिले जाता पूर्णतः व्यावसायिक चित्रपट ट्रीट मिळाल्याचे समाधान आपल्याला होते. नायकाच्या धरपकडीचा शेवट हा त्याला नियतीने शिकवलेल्या धड्यातून होतो. पूर्ण सिरीज पाहून झाल्यावर कुणाला हे पटकन लक्षात येईल तर कुणाला समजायला वेळ लागू शकतो.
तर अशी सगळी ती गोष्ट झाली. अन, म्हणून ती फिल्म बघून माझं डोकं गरगरले होते. एक दिवसच तसा राहिलो. त्यानंतर मग एक माझ्यातील चिकाटीच्या वृत्तीला पेटवणारे पुस्तक वाचलं अन गरगर शांत झाली. बघितल्या बघितल्या जर मी तत्काळ लिहायला घेतलं असतं तर भरमसाठ शब्दांत मी सगळं मांडत बसलो असतो. अन, स्वतःलाच अजून त्याचा वैचारिक ताण होऊ शकला असता. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी आज सगळं बाहेर काढलं. म्हणजे कसं उहापोह करायचा तर तो जरा चवदार पोह्यांचा व्हायला हवा ना !...
फिल्मची लिंक -
बघायला विसरू नका ©विशाल लोणारी, २०१९
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा