माणूस माणसासारखं वागणं विसरला आहे. मुंबईसारख्या मेट्रो शहरात तरी हा अनुभव निराळा नाही. याला जबाबदार कोण ? ढासळत गेलेल्या सामाजिक जाणिवा, वाढती गुन्हेगारी, अन माहिती व तंत्रज्ञानाने वेढले गेलेली अख्खी मानव जमात.
आज प्रत्येकाला चटक लागली आहे. खोट्या खोट्या प्रसिद्धीची हरेक माणूस बेताल-बेभान होत चालला आहे. अनेक वर्षे त्याला या प्रसिद्धी, प्रतिष्ठा या गोष्टी निव्वळ कर्तृत्ववान लोकांनाच मिळू शकतात, हेच माहीत होते पण हा विचार आता मागे पडला आहे. आता, अवघ्या मिनिटभरात तो सोशल मीडियावरून रातोरात स्टार बनू शकतोय. लोकांना भुरळ पाडतोय. त्याला प्राप्त होणाऱ्या जळमटेसारखी असणाऱ्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तो माणुसकी विसरत जात आहे. लोक घरात जळमटे लागलेलं ठेवत नाहीत. त्याचप्रमाणे सोशल मीडियातील लोकही कुणालाच कायम स्मरणात ठेवत नाहीत. त्यांना सतत नव्या गोष्टी बघण्याचा ध्यास लागलेला असतो. नव्या लोकांना भेटायची ईच्छा जागृत होते. त्यामुळे अनेक लोक एकमेकांना जवळ आलेत, कनेक्टेड झालेत पण त्यांच्यात जिव्हाळा उरला नाही. परिणामी माणुसकीचा झरा लोकांच्या हृदयाला फुटणे बंद झाले. सोशल मीडिया, तंत्रज्ञान यामुळे स्वतःचा आंनद त्यांना सर्वाधिक महत्वाचा वाटू लागला आहे.
आजूबाजूला असलेले लोक व्हॉट्सअप, फेसबुकवर परदेशात असलेल्या कधी न पाहिलेल्या माणसाशी तासंतास बोलतात. चॅट-कॉल करतात. पण, गाडीत आपल्याबरोबर प्रवास करणारी अनोळखी व्यक्ती रोज दिसूनही तिला आपलंसं करून घ्यावे वाटत नाही. पौगंडावस्थेतील मुलांच्या बाबतीत त्यांना पालक-शिक्षक रागवत असताना मनातून आपल्या चुकांचेही कौतुक करणाऱ्या ऑनलाइन जगातील लोकांशी बोलण्याची तीव्र ईच्छा निर्माण होत राहते. ह्या सगळ्याला जबाबदार आपणच आहोत.
इंटरनेटने एक चौकट प्रत्येकाला आखून दिली. त्या मर्यादित चौकटीत ढीगभर माहिती इंटरनेट ओतू लागलं. अगदी नाव वा फोटो असेल तरी एखाद्या व्यक्तीबद्दल कळून जाऊ लागलं. मग, लोक आपणहून कुणी दुसऱ्यांशी बोलणं विसरून गेले. आता, समजा त्यांच्या एकलकोंड्या जगातून त्यांना उठवायचा, बाहेर आणायचा प्रयत्न झाला तर मग सूड किंवा खुनशीपणाने लोक बोलायला नाही तर डायरेक गच्ची धरायलाच बघतात. हाच काय तो माणसांना दाटून येणारा मायेचा उन्माळा.
एकस्तिमित जगायची सवय झाल्याने माणूस टर्म्स अँड कंडिशन आखून जगू लागला आहे. नेहमीप्रमाणे त्यांना इतरांनी न वाचता स्वीकाराव्या अशी त्याची प्रबळ मनीषा असते. मग, तो आजूबाजूला असणारे सौंदर्य टिपण्याचे सोडून आंतरजालावरील बेगडी सुंदरता अनुभवत बसण्यात धन्यता मानतोय. आता, हे वाईट की चांगलं हा स्वतंत्र संवादाचा मुद्दा ठरतो. प्रत्येकाचा चष्मा वेगळा असतो. त्याला दिसणारे जग वेगळं असतं. पण, आजच्या काळातील हेच वास्तव ठरतंय. माणूस जोडला जातोय, आपलासा होत नाही. फ्रेंड्सपेक्षा फॉलोअर्स करण्यावर त्याचा भर दिला जातोय.
यावर माणसं वाचन अन पुस्तक वाचन हा एक सुंदर उपाय असू शकतो, त्यासाठी मात्र लॅपटॉप, मोबाईल सोडून आभाळाकडे, निसर्गाकडे, पाखरांकडे अन बाजूच्या माणसाकडे मान वर करून बघावं लागेल. इंटरनेटची चाकोरी तोडायला लागेल
© विशाल लोणारी, २०१९
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा