सलमान खान. बॉलिवूडचा सुपरस्टार असणारा सलमान. खाजगी आयुष्यात आलेल्या चढ-उतारांमुळे समाजात नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेला हा, खानपुत्र. काळवीट शिकार प्रकरण असो वा बेदरकार वाहन चालवून लोकांना ठार करणे, असो गेल्या काही वर्षांत सलमानचे खाजगी आयुष्य बऱ्यापैकी मलीन झाले आहे. मात्र, या सलमान खानच्या आत, एक संवेदनशील माणूस लपला आहे. हा मानवतेचा पुजारी आपल्या बिइंग ह्युमन फाऊंडेशनमार्फत अनेक गरजवंताचा त्राता झाला आहे, याकडे समाज दुर्लक्ष करताना दिसतो.
आतापर्यंत सलमान त्याच्या उद्दाम, उद्धट, बेफिकीर आणि रागीट स्वभावाचा माणूस म्हणून चर्चिला गेला आहे. याविरुद्ध सलमानमधील एक हळवं व्यक्तीमत्व अभावानेच कुणाला बघायला मिळत आहे. सध्या याची प्रचिती घेतली आहे ती एका चिमुरडीला. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मुडी गावातल्या शेतकरी कुटुंबातील मुलीला सलमान खानमुळे जीवदान मिळालं आहे.
मुडी गावात प्रमोद सूर्यवंशी हा तरुण शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्याला ओवी नावाची ६ महिन्याची मुलगीदेखील आहे. परंतु ही चिमुकली ओवी, ह्रदयरोगाने पीडित आहे. अगदी लहानग्या वयात तिला भयंकर आजार जडल्याचे कळल्यावर तर प्रमोद यांच्यावर आभाळच कोसळले. कोणत्याही हलाखीचा सामना करावा लागला तरी चालेल पण ओवीला बरे करण्याचा त्यांनी चंग बांधला.
ओवी हिची रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तिच्या नाजूक शरिरातील शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकाच रक्तनलिकेतून वाहू लागते, यामुळे ओवीाला श्वासोच्छवास करताना मरण यातना भोगाव्या लागतात. असा आजार मुळापासून बरा करण्यासाठी ओवीची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. आणि, त्यासाठीचा खर्च येणार होता ६ लाख ५३ हजार रुपये. मुलीचा जीव वाचावा यासाठी प्रमोदने उसनवारीने पैसा उभा करायचे ठरवले. तेव्हा भविष्याचा यत्किंचीतही विचार न करता या उमद्या शेतकऱ्याने आपली सगळी शेती गहाण ठेवली. मात्र, त्यातून आलेले पैसे पुरेसे नव्हते, मग प्रमोद याने शेत विक्रीस काढले. मात्र. या शेतीला कोणीच विकत घ्यायला तयार होत नव्हते. अशावेळी प्रमोद यांच्या डोळ्यात उतरला होता तो फक्त अंधकार.
या संकटाच्या परिस्थितीत प्रमोद यांच्या भावाच्या मित्राने त्यांना मदत करायचे ठरवले. त्यानंतर ओवीचे काका थेट सलमान खान यांच्या बिइंग ह्युमनच्या मुंबई कार्यालयात पोहोचले. सलमान यांची बहिण अर्पिताने ओवीच्या आजाराबद्दल सर्व प्रकारची शहानिशा करुन घेतली. कितपत मदत होऊ शकेल, याची शाश्वती अर्पिता यांनाही नव्हती.
आपल्या घरातील खळखळतं हसू तसेच टिकून राहणार की नाही, या विवंचनेत प्रमोद यांची रात्रीची झोप हरवली. प्रमोद यांच्या घरात ती सुखाची सकाळ उगवली. सलमान खानकडून ओवीच्या ऑपरेशन करण्याला मदत करण्याचे आश्वासन मिळाले. ओवीच्या आजाराची कहाणी ऐकून दबंग सलमान खान हळहळला. आणि मृत्यूच्या दाढेतून गोड ओवीला बाहेर काढण्याचे या बजरंगी भाईजानने ठरवले. ओवीचे ऑपरेशन पार पडले.
ज्याची एक झलक पाहण्यासाठी तरुणी कोणतंही दिव्य करायला तयार असतात. तोच सलमान खान ६ महिन्याच्या चिमुकलीला भेटण्यासाठी, वांद्रे येथील गॅलेक्सीतून थेट मुलुंडच्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचला. ओवीची त्याने विचारपूस केली, तिचा गोड पापाही घेतला. तिच्या नातेवाईकांची त्याने चौकशी केली. ऑपरेशनपर्यंतचा सर्व खर्चाचा तपशील त्याने जाणून घेतला. तेव्हा शेत गहाण ठेवल्याचे ओवीच्या काकांनी त्याला सांगितले. त्यांनतर सलमान या देवदुताने पुढे जी काही मदत केली, ती मुडीच्या सूर्यवंशी कुटुंबाच्या कायम स्मरणात राहील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा