जेएनयुचं बरंच काही
जवाहरलाल नेहरु हे गौरवशाली परंपरा सांगणारे विद्यापीठ. देशभरातील विद्यार्थी इथून शिकून आयुष्याचे सोनं करुन घेण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द ठेवत प्रवेशाची धडपड स्वीकारतात. मात्र, या जेएन विद्यापीठाच्या नावाला असा काळीमा लागावा, ही राजकीय, सामाजिक, शैक्षणिकही शोकांतीका म्हणावी लागेल. मुलांचे विचार, वागणे, निदर्शने अजिबात पटण्यासारखे नाही, परंतु त्याला आता चढू जाणारी राजकारण्यांची राजकीय ललिमा बघता हे प्रकरणही राजकीय षडयंत्र असल्याचे, सर्व पक्ष मिळून आता नवी भरड दळत असल्याचे आणि जनतेचे लक्ष रोहित वेमुला प्रकरणावरुन उडवून लावायचं असा हा कावा असल्याचा संशयाने बुद्धीला वेटोळे घातले आहे
काँग्रेस सरकारने त्यांच्या काळात अनेक चुकीचे निर्णय घेतले. निवडणूक तोंडावर येण्यापूर्वी तर ते जास्तच बिथरले होते. काय करु आणि कसे करुन निवडणूक जिंकू या विचाराच्या पिशाच्चाने त्यांना झपाटून टाकले होते. हे झपाटलेपण इतके भयानक स्वरूपाचे होते की त्यामुळे काश्मीरी लोकांच्या अस्मिता ठेचल्या गेल्या. अफझल दहशतवादी होता त्याला फाशी दिली जायला हवी, यात काही गैर नव्हते हे कायद्याने जरी पूर्ण सत्य होते. परंतु निव्वळ मतांसाठी 2001सालच्या दहशतवाद्याला फासावर लटकवले गेले. यामागील काळे हेतू दोन त्यातील पहिला तर ठार असफल झाला तो म्हणजे हिंदू लोकांची मते काँग्रेसला मिळाली नाहीच, तर दुसरा हेतू थोडाबहुत सफल घडताना दिसतो तो हा की काहीही करुन विद्यमान केंद्र सरकारला सुधारणा करण्याच्या कामात अडथळा ठरतील अशा गोष्टींची कपट पेरणी निवडणूक आधीच करुन ठेवणे, भाजप सत्तेवर येणार हे काँग्रेसला पक्के माहित होतेच म्हणून मग असा त्रास त्यांना होईल याची पूर्वसोय आधीच केली गेली.
काश्मीरी अफझलचा उदो उदो करायचा जेएनयुत शिकणाऱ्या अर्धवटांना पूर्ण अधिकार होता. गेल्या माणसाबद्दल भावनांचा बांध तुंबू देण्यापेक्षा वाहू देणेच उत्तम. मात्र यात पाकिस्तान समर्थन करण्याचे कारण काय होते ? भारताचे खाऊन पिऊन, चापून चुपुन भारतीय तेल डोक्याला रगडून पाकिस्तान जिंदाबाद म्हणणे अक्षम्य नव्हे काय ? सनी देओलने उपसलेला हातपंप विसरले होते काय ही नाठाळ मुले ! कारण डॉ. आंबेडकरांनी नेमून दिलेल्या संविधानाचा विसर यांच्या निर्बुद्ध मेंदूस पडणे स्वाभाविकच होते.
आणि आता महत्वाचा मुद्दा. शब्द आणि कृती यात खूप फरक आहे. शब्द हे फक्त ईच्छा व्यक्त करतात, तर कृती प्रत्यक्ष घडते, प्रत्यक्ष नुकसान घडायचे तर कृतीद्वारे होते, बोलून दर्शविलेल्या इच्छांनी तसे बौद्धिक, मनोवस्थेस एकवेळ हानी पोहोचू शकते. याला मानसोपचारी उपचार होऊन घोषणा देणाऱ्यांची मने स्वच्छ लखलखीत करता आली असती. पण रिश्तो के भी रुप बदलते है, नये नये साचे में ढलते है आणि पिढी दर पिढी नव्या गोष्टी बनतात असे म्हणत टीव्हीवर अधिराज्य गाजवलेल्या स्मृती बाईंनी जेएनयु मुलांची एक वेगळीच गोष्ट मांडल्याने हे प्रकरण अधिक चिघळण्यास अंशतः सुरुवातच झाली, त्यांचेच ज्येष्ठ सहकारी राजनाथ सिंह यांनीही नाकावरची माशी हुसकवायला देशद्रोहाची तलवार चालवल्याने मदर इंडियाचा(केंद्र सरकारचा) जीव जाण्याची अघटी घटना घडते की काय अशी वेळ आली आहे. बरं या दोन्ही लोकांच्या आक्रस्ताळेपणामुळे देशभरातील छोट्याछोट्या वारुळांतून जेएनयु निषेध करत, चिडून जात अनेक किड्यामुंग्या बाहेर अवास्तव हिंसा करत सुटलेत, सध्यातरी देशप्रेमचा अतिरेक वाटला तरी कुठेतरी तरी तो भाजप प्रेमाचा अतिरेक आहे असा भास सारखा होत राहतो. त्यात बाकीची पिल्लावळ सरकारला धारेवर धरुन मजा करत आहे. असाही मुस्लिम मतांचे अधिक्य तरी आपल्या बाजूने कायमचे झुकावे ही त्यांची भाबडी आशा.
हा प्रश्न भारतीय परंपरेनुसार पुढील अनेक वर्ष चघळून चघळून रवंथ केला जाईल. कन्हैयालाल या प्रकरणाच्या कंसात पूर्णपणे जखडून जाईल. देशद्रोहाची आधीची प्रकरणे अभ्यासून योग्य तो न्यायनिवाडा यथावकाश घेईलच. तोपर्यंत अनेक प्रकरणे, घोटाळे, घोषणा, वक्तव्य, कृती यांचे पाणी जेएनयुच्या ब्रीजखालून वाहतं होईल, मात्र शेवटी एक प्रश्न मेक इन इंडियाच्या स्वप्नात आपल्या रोजगाराची रंगवणाऱ्या सामान्य कामगाराला काय मिळणार ? इतर देशांना काय चित्र दिसणार !! सगळे मती गुंगवणार आहे, अविचारी लोक, दुविचारी सरकार यांच्या संघर्षातून माध्यमे मात्र पत वाढवून घेणार हे निश्चित.
®© विशाल लोणारी, नाशिक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा