जेव्हा कधीही व्यक्तीचा प्रवास सुरु असतो, असा प्रवास जो बहुकाळ, लांबच्या अंतरापर्यंत असतो तेव्हा अस्थित असे काहीही नसतेच मुळी. ना आपलं शरीर स्थिर असते, न आपल्या आजूबाजूची शरीरे स्थिर असतात, असते ती फक्त गतिमानता, ती गतिमानता जी चळाचळा कापत सुटते, ग्लानी चढून आलेले, थकलेल्या आपल्या मनाला, एकेक मनाचे तुकडे करून उधळून टाकत जात असते त्यांना मनाच्याही खोल असलेल्या दरीत, हो नक्कीच आजूबाजूस कितीही गोंगाट, अन घामाचा मेणचट वास असला, कुठे दारू, सिगारेट, कांद्याचा दर्प भणभणता असला ना तरीही प्रत्येकाला,अगदी प्रत्येकाला नोस्तेल्जिक व्हायला होतेच !
मला आठवते, स्पष्ट आठवते, मी सातवीत गेलो तेव्हा शाळेत नवीन रंगरंगोटी झालेली, आता परवाच जेव्हा वर्दळीच्या महात्मानगरपासून, मग मी दलित वस्तीच्या कलानगर, मग कामगार नगर असा आडवाटेचा प्रवास करून शाळेच्या बाहेर असलेल्या रस्त्याने लागलो तेव्हा ती, आमची जोडीची साखळी पळताना दिसली, विहिरीच्या कडेला डब्बे खाणारे शेंबडी पोरंही मला हात हलवून टाटा करत होती, मला दिसले की कसे मग जोड्या तूटताच एखादा बिचारा जोरदार मार खावून घ्यायचा, अगदी कधी कधी मार खाताना धरलेली पाठही त्याची शेकली जात असे, या खेळांचे नियमही भारी असतात हं, कारण शाळेतली छोटीशी, गवतागुळीची जागा, कोपर्यात निंब, मागे जंगल, पुढे बांधून पडीक झालेली संडास, अशा सगळ्या सिनरिओतही मुलं खेळायची, नियम म्हणजे जो नवीन येईल त्याच्यावर राज्य तर येईचंच, खूप लांब पळत जाऊ शकत नव्हते, जोडी तुटली तर सगळ्याच गड्यांना गर्रमागरम हाताचे धपाटे, पाठीचं थालीपीठ, धिरड होईपर्यंत. मला अशी खेळणारी, मुले दिसली, त्यात कुणी बुटका, लुकडा, कुणी जाडा, कुणी उंच, कुणी काळा, कुणी गोरा, ढांपणा, पण सगळे जवळपास एकाच पोशाखातली केसं अगदी बारीक केलेली मुलं, दिसली.
दिसली ? नाही, मला अस्पष्ट्श्या आकृत्या दिसल्या, भुते दिसली खरं सांगायचं तर, असंख्य आठवणींचा कोलाज दिसलं मला, त्यात मी दिसलो, माझे मित्रही दिसले, तो खड्डाही दिसला, तो डब्बा ही दिसलं, ती विहीरही दिसली, हो त्या आभासी आकृत्याच होत्या कारण, आम्ही जिथं धडपडलो, कडमडलो, पळालो, वाढलो, आमची पौगंडावस्था जिथे पहिल्यांदा ‘सेक्स, काय असतो, हे शिकली, परीक्षांच्या काळात जिथे आम्ही भारताचे स्वातंत्र्य साकारताना पाहीले ती जागा, ती जागा आता नेस्तनाबूत झाली होती, त्या आठवणींच्या खाईत आता भर घालून तिथे भव्य इमारतीत शाळा भरवली जात असे, मागच्या गुरुपौर्णिमेला मी जाऊन आलो, आतमध्येही, माझ्या आत्म्याचा अंश तिथेच भरकटत फिरत असतो, कित्येकदा, चल म्हटलं सोबत तरी अजूनही तो कधीच आलं नाहीये.
मी तिथल्या भिंती जेव्हा पहिल्या तेव्हा सगळ्या आक्षी रंगाच्या, मला वाटले हट्ट, हा काय रंग दिलाय, सगळ्या भिंती पुन्हा पिवळटल्या पाहिजेत, भिंत पिवळी आहे, हे सौंदर्यवाचक विधान शिकवले गेलं नाही का इथे, नसेलही किंबहुना शाळेत असताना मी तरी कुठं पु.ल वाचले होते म्हणा ! तर शाळेच्या भिंती कशा पिवळ्या, ढवळ रंगाच्या पाहिजेत. इथे गद्याची आठवण झाली, उगाचही असेल, आमचं गड्या, म्हणजे आता समाजात पंकज असे नाव मिरवणारा, बाईकवर गॉगल लावून हिंडनारा, पण अजूनही माझ्यासाठी माझा मित्र गड्याच तर आमचा गड्या, पु लं यांच्या लेखनातील एखादे पात्र असावे असा तो मला आज जाणवतो, त्याची तेव्हा गावराळ मराठी भाषा होती, लहेजा असा हेल देऊन शब्द बोलण्याचा होता, आणि तो गोरा होता म्हणून नाहीतर आफ्रिकेच्या जंगलात नेवून त्याला जर, गड्या ‘स्माईल’ कर असे म्हटले असते, त्याचे हसु मिटण्याच्या आतच एखादी फिमेल चिम्पाझीने येऊन त्याचा मुका घेतला असत, इतका माकडासारखा त्याचा तोंडावळा होता.
मी सहज पुढे जाऊन एका वर्गात डोकावून बघितलं, म्हटलं पाहूया बाकड्यावर उभी राहिलेली टारगट पोरं, आणि त्यांना ‘बुधवारचा, बाजार लावलाय का हा’ अशा रोरांवणाऱ्या दिवाण बाई कुठे दिसतायेत का ? अन त्यात माझ्यासारखा कुणी बाईला शिकवायला जाऊ पाहणारा, शांना आहे का, म्हणजे माझं कसे आहे ना चुकी झाली की लगेच टीका करून टाकतो, उद्देश चूक लक्षात यावी इतकाच, मी तरी सावध पवित्रा घेत तोंडातल्या तोंडात आवाज घुटमळेल इतक्या हळू, हलक्या, पिसार्यागत स्वर काढून बोललो की ‘आज, गुरुवार आहे’, बाईंची नजर कदाचित माझ्या ओठांवरून ओझरली असावी, त्यांना मी काय बोललो, सॉरी पुटपुटलो याची उत्सुकता लागली, तशी त्यांनी वर्गावर रोषलीही, पण कुण्यातरी आडदंडाला खाज येऊ लागली, त्याने पिन मारलीच बाईंकडे, मी कशी त्यांचे चुकीवर इवलेशे ओठांनी बोलचे ताशेरे ओढले, आता या नंतर मग जे मला पडली, जे मला पडली, शिव्यांची लाखोली हा शब्दही उना, अपुरा पडतोय म्हणून मी नक्की त्या शिव्या-अन फटकार्यांचे प्रमाण सांगू शकत नाही.
पण मी डोकावलो तेव्हा तिथे असे काहीच नव्हते, नवीनच कुणीतरी शिक्षिका मुलांना नवीनच काही धडे देत होत्या, मी कुणी पालक असावा म्हणून त्यांनी माझ्याकडे गांभीर्याने पाहिलंही नाही, माझ्या आवडत्या इंग्रजीच्या शिक्षिकेकडून मला समजले, खूप जुने लोक, सोडून गेलेत, सात वर्षात किती बदल झाला होता शाळेच्या स्टाफमध्ये ....
बाप रे ! किती, किती मोठं असते हे नोस्तेल्जिक होणे, असो, प्रवासात माझ्यासोबत अन्यजनही असेच त्यांच्या आयुष्यातल्या भावनांच्या भारती-ओहोटीने वाहून गेले असतील ना, शरीर त्यांचाही समुद्र बनले असेल अन त्यांनाही हृदयातली गाज ऐकू आली असेलच की, प्रवासात हे अनिवार्य असतेच, आणि तसे घडतेच यावर माझा ठाम विश्वास आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा