एका चौरस कागदाचे तुम्ही काय कराल ? कुणी म्हणेल त्यावर हिशेब लिहू, यादी लिहू, किंवा सगळ्यात चांगलं चोळामोळा करून फेकून देवू. पण टोच कागद त्याला कुठेच न कापता, कुठे न चिटकवता त्यातून एक आकर्षक असे फुल, बॉल, प्राणी, पक्षी तयार करता आले तर ? किती मोहक, आकर्षक असेल ते पाहणंही. काय आठवला तो कार्यानुभवाचा तास, हे सगळे करायचो आपण, ओरीगामितून.
एखादा कागद, न कापता, न चिटकवता त्याला फक्त घड्या घालून एखादी सुंदर, मोहक अशी कलाकृती तयार करता येते, ओरीगामित कागदाला घातलेल्या वेगवेगळ्या घड्यांमुळे प्राणी, पक्षी, फुले, आर्किटेक्चर्स, बॉल आणि अन्य भौमितिक आकार त्रिमितीय स्वरूपात बनवता येतात, चित्रात ज्याप्रमाणे आकृतीत दोन बाजू दिसतात त्याप्रमाणे अधिकच वास्तववादी कलाकृती ही ओरीगामित बनते, ज्यामुळे तिचं रुपडं हे अधिक आकर्षक, देखणे दिसते.
कविता करणे असो, संगीताची चाल बंधने असो, नृत्य असो किंवा एखादी जाहिरात निर्मित्ती असो या सगळ्यांत एक गोष्ट कटाक्षाने पाळली जाते, जपली जाते ती म्हणजे त्या कलेचे सौंदर्य आणि ओरीगामितही जपानी कलाकरांच्या पूर्वजांनी हा नियम या कलेसाठी लागू केला आहे. सगळं काही तर्कशुद्ध, शास्त्रोक्त पद्धतीनेच. मोहकता हा कुठल्याही कलेचा अविभाज्य घटक असावाच लागतो , ओरीगामीही तशीच आहे.
ओरीगामित अगदी झोकून देणारी कोल्हापूरची एक ओरिगामी कलावंत तेजा बांदल हिच्याशी माझी नाशकात ओळख झाली, ती तिच्या कलाकृतींचे प्रदर्शन आणि कार्यशाळेमुळे इथे आहे. तिच्याशी प्रथमच ओरीगामिविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यावेळेस तिने हे सर्व सांगितले. याचबरोबर ओरीगामिशी तिच्या ओळखीविषयी ती म्हणते की, ९ वर्षापूर्वी पुण्यातल्या फर्गसन महाविद्यालयात बीएच्या तिसर्या वर्षात शिकत असताना तिच्या मित्र-मैत्रींणीकडून तिला या कलेची देणगी मिळाली. आवड निर्माण झाल्यानंतर ओरिगामी शिकून ती पुढे मग वेगवेगळ्या कलाकृती कॉलेजच्या प्रोजेक्टसाठीही करू लागली.
आयुष्यात ओरिगामी कशी समृद्ध करते यावर तेजा सांगते की मला ओरीगामिनेच वेगळी ओळख दिली, माझे अस्तित्व मला ओरीगामितून मिळाले. ओरिगामी हे एक विज्ञान आहे, यात भूमितीची तत्वे आहेत, ज्यांतून मनोरंजनही होते आणि ज्ञानसाधनाही घडते, थोडक्यात ओरिगामी म्हणजेच मनोरंजनातून शिक्षण.
मित्रहो, भारताबाहेर ओरीगामिचे अनेक प्रदर्शने तेजाने भरवलीत, जपानमध्येही तिच्या कलाकृती सन्मानित झाल्या, भारतात नाशिकचे तिचे १२वे प्रदर्शन, तसेच ‘ओरिगामी मित्र’ या पुण्यातील संघामार्फतही तेजा कार्यरत असतेच. ओरीगामितील तिचे अनेक प्रोजेक्ट्स हे ‘लाईन-अप’ आहेत.
तेजाच्या विचारांत ओरिगामी, असे विचारताच.... ती दिलखुलासपणे सांगते, ही कला आजारपणावरचे औषध आहे, मनावरची मरगळ दूर करण्यासाठी, स्वतःला गुंतवून घेण्यासाठीचे, एकाग्रता वाढवणारे टॉनिक आहे.
पुढे, तेजाला ओरीगामित तुला वेगळे काय योगदान द्यायचे याविषयी मी विचारलेच तर अगदी मनमोकळेपणाने तिने सांगून टाकले की हल्लीची लहानमुले आपण खेळलेलो भातुकलीचा खेळ अगदी विसरून गेलीत, ती छोटी-छोटी खेळणी, लुटूपूटूचा संसार हे सगळे काळाच्या ओघात मागे पडले आणि मुलांच्या हातात पीएसपी आलेत, त्यामुळे तो मागे पडलेल्या भातुकलीचा खेळ तेजाला ओरीगामितून पुनर्जीवित करायचा आहे, ही तिची महत्वकांक्षा आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा