पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र, आता हा स्तंभ, स्तंभ न राहता अवघी एक भव्य इमारत झाली आहे. असे म्हणण्याचा अर्थ हाच की आता, पत्रकारितेच्या आणि पर्यायाने पत्रकारांच्या कामकाजाच्या कक्षा या रुंदावत चालल्या आहेत. वृत्तपत्र, आकाशवाणीबरोबरच आता दूरचित्रवाणी, आंतरजाल (टीव्ही आणि इंटरनेट) या माध्यमांचाही वावर जनसामान्यांपर्यंत पोहोचलाच नाही तर त्यांच्या अंगवळणी पडला आहे आणि म्हणूनच आज भारतातल्या पत्रकारितेत ही एक नवीन गरज निर्माण झाली, ती म्हणजे अपुर्या मनुष्यबळामुळे असेल कदाचित पण बहुमाध्यमांत बहुखुबीने काम करू शकणाऱ्या पत्रकारांची.बहुमाध्यमी पत्रकार ही संकल्पना स्पष्ट करताना माध्यमे कोणती याचा जरा विचार करूया, टीव्ही, इंटरनेट, वृत्तपत्रे, आणि आकाशवाणी, ही ती सध्याची प्रमुख माध्यमे जी माहिती, मनोरंजन आणि बातम्यांच्या जागतिक प्रसारांसाठी कारणीभूत ठरतात. बहुमाध्यमी म्हणजेच या सर्व माध्यमांतून एकाचवेळी प्रसारकाचा अवतार धारण करू शकणारा पत्रकार होय. अशा पत्रकाराने प्रथमतः बातमी गोळा केली पाहिजे मग ती उंची, रुंदीच्या रकान्यात व्यवस्थित संपादित करून घुसडली पाहिजे मग तीच बातमी त्याने साधारण एका मिनिटात सांगून संपेल म्हणजे १०० शब्दांत बसवून ती आकाशवाणीवर वाजवली पाहिजे, आणि मग त्याच बातमीचे पॅकेजात रुपांतर करून टीव्हीवरही ती बोंबलून दाखवता आली पाहिजे, इंटरनेटवर पोस्ट करण्याची किरकोळ जबाबदारी पेलायची ताकतही त्याला लावणे भाग आहे हं.
आता, याचा फायदा तसं बघायला गेला तर, पत्रकाराला नक्कीच आहे. पत्रकाराला एका जागी धड शांत बसण्याची कुवत नसल्याने सतत तो कामात व्यग्र होऊ शकतो, कामातील वैविध्याच्या धुंदीत बुडून वेगवेगळे प्रयोग तो करू शकतो. काम कितीही, कोणतेही असो ते जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने आणि विशेष म्हणजे डोके लढवून केल्याने त्या कामाची मजाही लुटता येते, किती नाही म्हटलं तरी अर्थकारण हे आलंच, उदारभरण नोहेसाठी बहुमाध्यमी यज्ञकर्माचा मार्ग चोखंदळायला पत्रकार तयार होतो. आता, यातून अजूनही काही वेगळे मुद्दे समोर येतातच ते म्हणजे, खरंच गरज आहे का ? वैचारिक बैठक, सामाजिक कळवळा यांच्यापलीकडे निव्वळ राजकीय, आर्थिक सत्ताकारण केंद्रबिंदू बनलेल्या या नवमाध्यमांच्या गुलामीची खरंच गरज आहे का ? जन्माचा आळसावलेल्या पत्रकाराला तासंतास काम करत राहणे मानसिकदृष्ट्या परवडण्याजोगे आहे का ? आरोग्याच्या समस्या अशा सतत ऑन ड्युटी असलेल्यांना होत नाही असे काही आहे का ?
असो, जेणेत्याने स्वविवेका चिंतनाने ठरवायचे आहे की किती आहे बहुमाध्यमी पत्रकाराची गरज ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा