‘’मुंबई दिनांक’, ‘सिंहासन’ किंवा ‘त्रिशंकू’ या अधिक ’माहीत असलेल्या पुस्तकांवर लिहिण्याची संपादकांची अपेक्षा असली, तरी या लेखात लिहायचं आहे ते ‘’मुखवटा’ या 1999 साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीबद्दल. खरं म्हणजे ‘’मुखवटा’ची (पृ. 554) आतापर्यंत चार पुनर्मुद्रण झाली आहेत, पण ती या इतर कादंब-याइतकी चर्चिली गेली नाहीत त्यास काही कारणं असावीत. वरील पहिल्या दोन कादंब-या मराठी वाचनसंस्कृती ऐन भरात असताना प्रसिद्ध झाल्या आणि त्यांचे विषयही मराठी कादंबरीसाठी नवीनच. ’मुखवटा’ आली तेव्हा संगणकीय-डिजिटल क्रांतीचा ब-यापैकी प्रसार होऊन तरुणांचं वाचनावरून लक्ष उडू लागलं होतं. त्याचं धक्का देणारं प्रत्यंतर आलं. एक-दोन महत्त्वाचे अपवाद वगळता प्रतिष्ठित नियतकालिकांनी कादंबरीकडे दुर्लक्ष केलं. जाणकार समीक्षकांनी तेव्हा आणि नंतरही कधी दखल घेतली नाही. वाचकांच्या पत्रांचा मात्र समाधानकारक प्रतिसाद होता. पत्रं येत ती कार्डावर किंवा इनलँडवर नव्हे तर 8-10 पानी. इंटरनेट सुलभ झालं तेव्हा प्रतिसाद वाढला.
इथे ही कादंबरी निवडण्याचं हे कारण नव्हे. मला स्वत:ला आणि ज्यांना मानतो अशा पुष्कळ वाचकांना ’मुखवटा’ अनेक कारणांनी महत्त्वाची वाटते. काहींना ‘त्रिशंकू’. गमतीची गोष्ट म्हणजे ‘त्रिशंकू’देखील त्या वेळी मराठी समीक्षकांनी दुर्लक्षितच केली. हिंदी भाषांतराची मात्र हिंदी साहित्यसृष्टीत ब-यापैकी दखल घेतली गेली. ‘’मुखवटा’वर आलेली पत्रं आणि नंतरची ’मेल किंवा ब्लॉग्ज उद्घृत करण्याचा लेखकाला संकोच वाटेल. या बाबतीत प्रमाण स्वत:चं मत किंवा अंतमर्रमन हेच. जे प्रमेय मनाशी योजलं होतं ते ब-यापैकी सिद्ध केलं आणि ते वाचकांनाही भावलं. एवढंच नव्हे, तर कित्येकांना त्यात एकमेकांतून निघालेल्या प्रमेयांच्या जुड्याच सापडल्या. हे कारण पुरेसं आहे. ही कादंबरी मला स्वत:ला महत्त्वाची का वाटते ते पुढे ओघामधे आणखी येईलच.
कादंबरीची गोष्ट सांगणं अवघड.
आकसी नामक वर्हाडातील खेड्यात कित्येक पिढ्यांपासून राहणा-या (ब्राह्मण) कुटुंबाच्या वंशवृक्षाची कहाणी, हे या कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र. तसे घराण्याचे संदर्भ आहेत तेरा-चौदाव्या शतकापासूनचे. ‘ब्राह्मण’ शब्द कंसात टाकला- कारण त्यांच्याबरोबरच परिसरातील इतर सर्व समाजघटकांचं व एकूणच समूहाच्या सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक तणावांचं, संघर्षाचं व त्यातून बदलणा-या वास्तवाचंही गुंतागुंतीचं चित्र आहे. शतकानुशतकं गावगाड्याच्या चौकटमधे गोठून राहिलेल्या भारतीय खेड्याचा बाहेरच्या जगाशी संबंध यायचा तो मुख्यत: राज्यकर्त्यांकडून सारावसुलीसाठी. गावचा प्रमुख (पाटील) मध्यस्थासाररखं काम करून बाहेरच्या राजकीय उलथापालथीपासून खेड्याला उपद्रव होऊ देत नसे. ब्रिटिश राज्यकर्ते आल्यावर परिस्थिती बदलली. सारावसुली थेट शेतकर्यांकडून केली जाऊ लागली. पश्चिम महाराष्ट्रात जमिनीची रयतवारी असल्याने व्यवस्थेला जबर दणका बसला. विदर्भात मात्र मोठ्या प्रमाणावर जमीनदारी असल्याने प्रभाव कमी होता, पण राज्यकर्ते कारभारात गंभीर असल्याने इतर मार्गाने त्यांचा प्रभाव खेड्यांवर पडत होताच. सुधारणांचं वारं आलं, रस्ते-शाळा आल्या. सावकार, व्यापारी खेड्यातच आले. शिवाय शिक्षण, सरकारी नोक-या, रेल्वे, पोस्ट... हळूहळू खेडी बदलू लागली होतीच. स्वातंत्र्यानंतर बदलाचं प्रमाण झपाट्याने वाढलं. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती त्यात विलीन झाला तेव्हा तर हा झपाटा अधिकच वाढला. कूळकायदा आला, सामाजिक व राजकीय जागृती वाढली. आकसी गावही या झपाट्यामधे येऊ लागलं.
अक्षीकर बाह्मणाचं घराणं पुरातन विशाल वटवृक्षासारखं. खोल आणि दूरवर मुळं पसरलेली फांदया आणि पारंब्या वृक्षाच्या आश्रयाने राहणारे आणि येणारे-जाणारे असंख्य पक्षी. सध्याच्या पिढीतील या कुटुंबात तीन भाऊ आणि एक बहीण. ज्येष्ठ बंधू अण्णासाहेब वकिलीसाठी नागपुरात जातात आणि भरपूर नाव कमावतात. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव दिल्लीत आय.ए.एस. अधिकारी. अण्णासाहेबांच्या खालचे राजाभाऊ रहस्यमय कारणांमुळे परागंदा. त्यांची मुलं मात्र पुढे गेलेली. एक वायुदलात. एक अमेरिकेत स्थायिक. धाकटे आबा सालस, मितभाषी व धार्मिक. गावी राहून जमीन कसणारे. मूळ शास्त्र्याचं कुटुंब पुढे भिक्षुकी, सावकारी करणारं. तेही जाऊन शेती. आणि मग शेती होत नाही म्हणून शिक्षण घेऊन आस्ते आस्ते स्थलांतर शहरांकडे. कालमानानुसार वृक्ष आता वठत चालला आहे आणि पक्ष्यांना आकर्षून घेण्याची त्याची शक्ती कमी होत चालली आहे. या घराच्या बरोबरीने त्यांच्या शेतीवरील कुणबी-मराठा कुटुंब, तथाकथित अस्पृश्य (महार) कुटुंब यांचीही आधुनिक काळाकडे होणारी वाटचाल... अशी ढोबळ कथा. तशी सुपरिचित. कुटुंब आणि गाव अस्सल वर्हाडातलं, म्हणजे अमरावती जिल्ह्यातील पूर्णा-चंद्रभागा खो-यातलं. पण गोष्ट म्हणून हे वर्णन दिशाभूल करणारं आहे. कारण या कालखंडातून तीन-चार सामाजिक आणि सांस्कृतिक असे सार्वकालीन पदर कादंबरीत अथपासून इतिपर्यंत घट्ट गुंफत आणले आहेत. तोच या कादंबरीचा गाभा आणि तेच ईप्सितही.
शास्त्री, उपाध्ये, बडवे, पंडे तीर्थस्थळी वंशावळी ठेवतात. नोंदणी शास्त्रशुद्ध नसली तरी ब-यापैकी विश्वासार्ह असते, पण सहसा त्यामधे पुरुषांचीच उतरंड. कुळामधे विवाहबंधनाने बाहेरून आलेल्या स्त्रियांची अगदी तोकडी नोंद. अधेमधे रिकाम्या जागा. कुलशुद्ध्त्वाची ग्वाही देणं कठीणच. आधुनिक काळात या गोष्टीला महत्त्व नाही. पण विसाव्या शतकाच्या मध्यास अक्षीकरांच्या सोवळ्या अग्निहोत्री पिढ्यांमधे घराण्यातील एका विचित्र परंपरेबद्दल सूक्ष्म सल आहे. घराण्याच्या सात शतकांपूर्वीच्या आदिपुरुषाचा वार्षिक सोहळा होतो त्या दिवशी आदिपुरुषाच्या मुखवट्याच्या ’मुख्य पूजेचा मान आहे सवाष्ण दलित स्त्रीला. ही प्रथा कटाक्षाने पाळली जाते, पण तिचं ’मूळ कुणालाच माहीत नाही. कादंबरीच्या शेवटी अक्षीकर कुळातलेच शास्त्रसंपन्न वृद्ध तात्याजी- काही तांत्रिक विक्षेप आल्याने ’मख्य कुटुंबापासून दूर गेलेले - सर्व गावासमोर तो मुखवटा नदीत बुडवून या प्रथेला तिलांजली देतात.
याही घटनेला विशेष निमित्त आहे. जी दलित स्त्री वर्षसणाच्या दिवशी नदीतील उंच पाषाणावर गेली दोन तपं आदिपुरुषाच्या मुखवट्याची प्रथा पूजा करत आली, ती आज ऐन वेळी नाहीशी झाली आहे. पूजा ठप्प. गावही ठप्प. गावात बौद्धांची घरं आहेत, पण त्यांचा उपयोग नाही. एका महार घरी सवाष्ण आहे, पण ती पायाने अधू. बाहेरगावाहून तयार करून कोणाला आणायचं तर दिवस बुडणार. कुठे गेली ही नेहमीची सवाष्ण? मग कळतं, मुंबईच्या दलित चळवळीत भाग घेणा-या तिच्या बंडखोर मुलाने जावयाच्या अपघाताची खोटी कारणं सांगून तिला रात्रीच्या गाडीने मुंबईला नेलं आहे. हा दलित बंडखोर आबा अक्षीकरांच्या धाकट्या मुलाचा मित्र. ज्येष्ठ मुलगा बाळला संशय आहे, आपल्या भावानेच त्या बंडखोराला फूस लावली.
आबांची किशोरवयीन धाकटी मुलगी शोभा शाळेतील गुरुजीच्या प्रेमात पडते. मुलगी कवितेची नादी आणि गुरुजीही तुकारामभक्त कवीच. जातीने शिंपी. कसं होणार? समजुतदार गुरुजी बदली करून घेतो. पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधे निवड होऊन लेक्चरर म्हणून तो मुंबईला जातो. ही निष्पाप मुलगी, बाहेरचं जग न पाहिलेली... पण प्रेमाची ओढ अशी जबरदस्त, की कुटुंबामधे एक निकराचा प्रसंग चालू असताना ती घरातून पळून थेट मुंबईच गाठते. प्रेम सफल होत नाहीच. पण ही गावंढळ मुलगी...हिच्यात कोणती स्त्रीशक्ती संचारते कोणास ठाऊक! घरी न परतता, न डगमगता पुण्यात नवं आयुष्य सुरू करून कवितेत नाव कमावते. सारेजण नावं ठेवतात, पण तिची काकू नानी मात्र तिचं समर्थन करत राहते.
ही नानी कोण? काळाच्या झपाट्याला तोंड देत कसोशीने अजूनपर्यंत या कुटुंबाला, कुटुंबाच्या कुलसंस्कृतीला सावरून धरण्याचा प्रयत्न करणारी. विवाह- बंधनाने अक्षीकरांच्या कुळात बाहेरून प्रवेश करती झालेली निपुत्रिक बालविधवा विकेशा. नव-याचं तोंडही तिला आठवत नाही. तो मेला तेव्हा ऋतू प्राप्त व्हायला अवकाश होता. नव-याची सारी भावंडं सावत्र. ज्या घराशी तिचं रक्तही िम’सळलं नाही त्या प्रेमळ कुटुंबाच्या खस्ता खात ती आयुष्य काढते. ही वृद्ध निपुत्रिक नानी, तीच या कादंबरीची नायिका. माहेर परकं झालेलं. श्रीमंत ब्राह्मण जमीनदाराची पहिली पत्नी म्हणजे नानीची जननी गेल्यावर बापाने तरुण देखण्या मुलीशी लग्न केलेलं. ही सावत्र आई आपल्या भावांसह नानीच्या बापाचा व इस्टेटीचा पूर्ण कब्जा घेते आणि कोवळ्या वयात विधवा होऊन माहेरी आलेल्या नानीला पाण्यात पाहत मोलकरणीपेक्षाही वाईट वागवते. छळ-छळ छळणा-या सावत्र आईजवळ राहणं कठीण. योगायोगाने अक्षीकर घराण्यातील दूरचे सुधारक मताचे सासरे पाहुणे म्हणून त्या घरी येतात आणि नानीचे हाल बघून तिला आकसीला अक्षीकरांच्या घरी पाठवतात. आता नानीला आयुष्य काढायचंय ते याच परक्या घरी, कुठलेच लागेबांधे न उरलेल्या सासरी. कष्टांतूनच तिला या घरात आपोआप अधिकार प्राप्त होतात. किंबहुना ती सारं घर आणि कूळ तेथील माणसांसह व विस्तारलेल्या कुटुंबासह निरपेक्ष कष्टांनी व प्रेमाने आपलंसं करून टाकते. अक्षीकर घराण्याच्या परंपरा आणि कुलधर्म यांची ती खरी पाईक बनते. उसन्या नातेवाइकांच्या मुलाबाळांना मायेच्या घट्ट धाग्याने जखडून ठेवणारी, आपल्या कर्तृत्वाने व निष्ठेने घराण्याच्या परंपरा जपून त्यांना नवी वळणं देणारी, धाकट्या जावांना आणि सुनांना आपुलकी व प्रेमाच्या दडपणाने धाकात ठेवणारी. अखेर प्रत्येक घरातील वैशिष्टय़पूर्ण कुलसंस्कृती, मूल्यव्यवस्था, कुलधर्म, आचारधर्म’ आणि पाकसंस्कृती- देखील डोळ्यात तेल घालून जतन करतात आणि त्यात भर घालून अधिक समृद्ध करतात त्या परक्या घरांतून आलेल्या स्त्रियाच, कुलधर्माचा टेंभा मिरविणारे भटके पुरुष नव्हे.
आणि हे सारं समजून घेणारा आहे तो नानीने धाकट्या जावेचा दत्तक घेतलेला मुलगा बाळ. बुद्धिमान पण वर्हाडी आळसात बुडालेला, वैफल्याने घेरलेला, बायकोवर राग काढणारा. दोन्ही काका बाहेर पडले. त्यांची मुलं शिकून- सवरून गगनाला गवसणी घालताहेत. वडील आबा उरले मागे शेती बघायला. आपणही इथेच गाडलेले..... इथेच कुचंबणार. कालांतराने त्याच्या लक्षात येऊ लागतं, की सगळ्या चुलत भावजयांपेक्षा आपली बायको किती सुंदर आहे! अंगावर फारसे दागिने नसतीलही; पण भावजया तिचा हेवा करतात. लग्न करून आल्यापासून तिनेही सहजपणे या घराची संस्कृती आत्मसात केली आहे. कुलधर्म’, परंपरा, कुलेतिहास सारं तिला आता आपल्यापेक्षा अधिक ठाऊक. आणि वयाने लहान असूनही केवळ आपल्या कौटुंबिक कर्तृत्वातून आणि गृहकौशल्यातून सा-या घराण्यात ती हळूहळू नानीच्या बरोबरीने अधिकार प्राप्त करू लागली आहे. मुळातच आळशी असलेला बाळ पत्नीच्या या स्त्रीशक्तीच्या गुरुत्वाकर्षणाने प्रभावित होऊन तिच्या राज्यात निर्धास्त राहणं पसंत करतो.
कादंबरीत एवढे पदर, नात्यांची आणि जिव्हाळ्याच्या संबंधांची एवढी गुंतागुंत आहे की छोट्या लेखात गोष्ट सांगणं अशक्य. अक्षीकरांच्या बाहेर गेलेल्या शाखा, त्यांची मुलं... काही परदेशांत, काही बडे पगारदार त्यांची तुटत चाललेली तरीही चिवटपणे मागे खेचणारी शेतीची, मातीची, नानीची, कुटुंबाच्या जिव्हाळ्याची आणि सांस्कृतिक व धार्मिक परंपरांची ओढ... वायुदलात असलेला मुलगा 1971-72च्या भारत-पाकिस्तान युद्धात गुंततो आहे. एक बालपणीच अध्यात्माच्या मार्गावर, एक आणीबाणीत भूमिगत. अक्षीकरांच्या शेतीवर बटाईने काम करणारे कुणबी-मराठा आढाव कुटुंब, त्यांचे ’मुलगे व मुली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून परिस्थितीमधे सूक्ष्म बदल होताहेत. खरं म्हणजे कूळकायदा झाला आणि 1960 साली महाराष्ट्र राज्य झालं तेव्हापासून आता नाममात्र जमीनदार उरलेले अक्षीकर आणि त्यांचं तथाकथित आश्रित आढाव या दोन्ही कुटुंबांची परिस्थिती पालटते आहे. नव्या जमान्यात आढावांचा गावात वाढत चाललेला दबदबा आणि त्यांच्या मुलांच्या वाढत चाललेल्या सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक आकांक्षा; आणि तरीही या कुटुंबातील स्त्री नानीच्या जुन्या जिव्हाळ्याच्या ओढीने अक्षीकरांच्या वाड्यावर वर्षदिनाला भांडी घासतेच आहे. एक मुलगा तर आमदार होऊन मंत्रिपदाची स्वप्नं पाहतो आहे. मुलीचा नवरा मंबईला मंत्र्याचा खासगी सचिव. बापाने सारं वैभव गमावलेलं. पण हा संपत्ती जोडत वंशावळ वाढवण्याची जिद्द धरून आहे. पण आढावांच्या मुलीला मूल होत नाहीये. वंशसातत्याची अपार आकांक्षा. त्या भानगडीत या मुलीचे आणि भावांचे संबंध बिघडलेले... इकडे जुन्या काळापासून चालत आलेले आढाव व अक्षीकर कुटुंबांचे संबंध अत्यंत गुंतागुंतीचे. अक्षीकरांच्या उर्वरित कुटुंबाच्या अर्थार्जन व शिक्षणासाठी गाव सोडून गेलेल्या भावांच्या जमिनी बटाईसाठी आता आढावांकडे, म्हणजे त्यांच्या मालकीच्या होणा-या आणि दोन-तीन पिढ्यांपूर्वी कठीण काळात आढावांनीच आपल्या जमिनीचा पट्टा अक्षीकर सावकारांना लिहून दिलेला. म्हणजे त्याच जमिनीचे असे हेलपाटे!
वंशसातत्याची सनातन ओढ, तडफड तर कित्येकांना. नागपुरास वकिलीत खो-याने पैसे कमावणारा बाळचा तर्ककठोर, आधुनिक विचारांचा चुलत भाऊ रवींद्र मूल होत नाही म्हणून झुरणा-या पत्नीच्या समाधानासाठी बुवा-महाराजांचे गंडेदोरे घेतो. आकसीच्या बुवाचा कलंकित पूर्वेतिहास माहीत असूनदेखील केवळ बायकोच्या समाधानासाठी त्याच्यासमोर नाक घासण्यास तो तयार होतो. तात्याजीदेखील यातून सुटले नाहीत. अक्षीकरांचं अग्निहोत्र खरं म्हणजे तात्यांच्या शाखेत आलेलं, पण ते आता बंद. कारण वेदान्ताचा शास्त्रोक्त अभ्यास केलेले व्युत्पन्न तात्याजी अद्वैतवादातून आता निरीश्वरवादाकडे प्रवास करताहेत. ठार दरिद्री. खिंडारासारख्या घरात राहताहेत. सुमार बुद्धीचा मोठा मुलगा अविवाहित आणि वार्धक्याकडे झुकलेला. थोडी भिक्षुकी, थोडे ज्योतिष सांगत दोन घास खाण्यापुरते कसेबसे कमावतो. धाकटा तीक्ष्ण तैलबुद्धीचा, पण सारं सोडून दारूत बुडालेला, वाया गेलेला. तो तेली जातीतील मुलीच्या प्रेमात पडतो, लग्न करतो आणि सुधारतो. तात्याजी आपलं ब्राह्मण्य गुंडाळून नातवाला-वंशाच्या दिव्याला- मोठमोठ्या तृप्तीने खेळवू लागतात.... तात्याजी आणि आढावांचे ज्येष्ठ वृद्ध शेषराव यांचं सख्य. वार्धक्याला सांभाळत आयुष्याच्या दोरीला चिकटून राहण्याची या दोघांची सुप्त चढाओढ. आपल्यापेक्षा वयाने कनिष्ठ असे आबासारखे लोक वरची वाट धरताहेत आणि आपण कसे या दोरीला घट्ट धरून आहोत त्याचा विकृत आनंद व किंचित मिश्कील असा अपराधी भाव. आबाच्या अंत्ययात्रेला सारी पंचक्रोशी लोटते याचं त्यांना आणि पुष्कळांना आश्चर्य वाटतं. साधासुधा अबोल आबा पंचक्रोशीत एवढा लोकप्रिय कसा? घर, शेती आणि आसपासची देवळं आणि मठ यापलीकडे बाहेरचं जगही न पाहिलेला. पण आढाव आणि त्यांच्यासारख्या इतर कुटुंबांना, दलितांना नाही आश्चर्य वाटत. त्यांच्या दृष्टीने आबा एक पुण्यवान आत्मा. नाकासमोर चालणारा, कुणाचंही वाईट न चिंतणारा, सगळ्यांचं शुभ पाहणारा, न बोलता मायाळूपणे सर्वांना मदतीचा हात देणारा....
आणखी किती तरी ताणेबाणे. जातिकारण, समाजकारण, राजकारण, संस्कृतिकारण, धरर्मकारण यांचं विलक्षण रसायन, गुंतवळे, कालौघाची वाढलेली गती, गावाचा बदलता भूगोल व वातावरण, सुधारणांमुळे वेगाने बदलणारं गाव, बदलती माणसं आणि त्यांचे बदलते स्वभाव... असा संथ पण विलक्षण भोवर्यांनी घुसळून निघणारा कालौघ. गीतेमधे श्रीकृष्णाने नित्यानित्य संसाराला ऊर्ध्वमूलं अध:शाखा म्हणजे वर मुळं व खाली फांद्या असलेल्या अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली त्याची आठवण देणारा हा विशाल वटवृक्ष. हाच तो अश्वत्थ म्हणजे बदलाच्या भोव-यातील समाज म्हणावा, किंवा एक उदाहरण म्हणून अक्षीकरांचं परिवर्तनाच्या झपाट्यात सापडलेलं विस्तीर्ण कूळ म्हणावं. असंच योजलं होतं, असं लेखकाने म्हणायला नको. तसं झालं खरं.
‘’मुखवटा’चा हा माहोल मनात कित्येक वर्षांपासून घोळत होता. वाचकांना साहित्य कथाविषयाला लेखकाच्या आत्मचरित्राशी जोडण्याची सवय असते. लेखकांनाही ते आवडतं. मला ते पटत नाही. प्रत्यक्ष अनुभव ही दुय्यम बाब आहे. हे खरं, की ‘’मुखवटा’चं मुख्य कथाविश्व ज्या भौगोलिक प्रदेशात उभं राहतं त्या परिसरात माझा जन्म झाला, बालपण गेलं. त्या स्मृती तपशीलवार नसतातच. प्रत्यक्ष आठवणींपेक्षा त्या परिसराचं तपशीलविरहित सांस्कृतिक स्वभावचित्र अंत-यामी ठसणं महत्त्वाचं. चूक होण्याचा संभव कमी. त्यामुळे प्रतिक्षिप्त प्रेरणेतून माझ्याकडून तो परिसर निवडला गेला असावा. वास्तविक पाहता तपशील भरण्यासाठी मला ब-यापैकी अभ्यास करावा लागला. तपशील दक्षिण महाराष्ट्र, कोकण किंवा खानदेशातील एखाद्या तालुक्याचा मिळवता येईल, पण हेच कथाविश्व तेथील सांस्कृतिक स्वभाव-चरित्रामधे घोळवण्याचा आत्मविश्वास कठीण. लक्षात येतं, की लहानपणी ब्राह्मण कुटुंबातील निपुत्रिक आणि विकेशा बालविधवांचं प्रमाण नगण्य नव्हतं. त्यातील कित्येक स्त्रिया कुटुंबाच्या कर्त्या असत आणि त्यांच्या परवानगीशिवाय घरातील पान हलत नसे. सहज निरीक्षणात आलेल्या पाच-दहा व्यक्तींच्या सरमिसळीमधून कदाचित एखादी ढोबळ आकृती तयार होते आणि त्यात लेखकाने आरोपित केलेले विचार आणि त्याच्या मनातील रंग भरवले गेले की कादंबरीतील धूसर व्यक्तिचित्र तयार होत असावं. पुढचा तपशील लेखकाच्या कल्पनाशक्तीतून. ते पात्र जन्म घेतं कादंबरीतच आणि नवजात अर्भकाची वाढ होऊन क्रमाक्रमाने ते प्रगल्भ होत जावं तसं ते पूर्णाकार घेतं तेही कादंबरीतच.
उपरोक्त माहोल मनात घोळत असताना आणि नानीबद्दलचे प्रश्न अंतर्मनात घुसळत असताना एक विचार सारखा खुणावत होता. पत्नीस गृहिणी, माता, सखी, गुरुणी असंही गूढार्थाने कवी कल्पितात. पृथ्वीवरील कोणत्याही प्रजातीचं आदिम मूळ हे मादी, असं शास्त्रज्ञ सांगतात. स्त्रीजातीच्या श्रेष्ठत्वाचं हे तत्त्व कोणालाही अंत:प्रेरणेने कळू शकतं. हे सत्य बहुतेक पुरुषांना मनोमन ठाऊक असतं पण त्यांना कबूल करवत नाही. जगातील बहुतेक साहित्य आणि धर्मग्रंथ हे पुरातन कालापासून पुरुषश्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा निकराचा प्रयत्न करत आले असले तरी निसर्गाचं सत्य त्यांना खिजवत राहिलं आहे. पुरातन काळी कुठे कुठे स्त्रीप्रधान मातृसत्ताक कुटुंबपद्धती आणि समाज नियमन अस्तित्वात होतं. आताच्या पोस्ट-पोस्ट मॉडर्न डिजिटल युगात पुन्हा ती संस्कृती येऊ घातली आहे, असंही समाजशास्त्रज्ञ सांगतात. या विषयाच्या मन:पूर्वक ओढीने घरीदारी नकळत होणा-या निरीक्षणांवर काही टिपणं घेत राहिलो. नंतर लक्षात आलं, की हा तर भव्य कादंबरीचा ऐवज. मग टिपणांचं वळण त्या दिशेने जाऊ लागलं. टिपणांना मर्त्य आकार येऊन त्यांमधे हाडा-मांसाची माणसं येऊ लागली. ती राहिली. मात्र, पुढे व्यवसायातील कामं, प्रवासांचा झपाटा यामुळे टिपणांकडे दुर्लक्ष होऊ लागलं. एवढा विस्तीर्ण आणि खाली मुळं पसरलेला गुंतागुंतीचा ऐवज झेपेल, कादंबरीत मावेल, वाचकांपर्यंत पोचेल याचा विश्वास वाटेना. तरीही भुताने झपाटलेलं झाड सोडू नये तसं डोक्याचं झालं.
अशात ‘अबकडई’चे संपादक चंद्रकांत खोत यांनी त्यांच्या दिवाळी अंकासाठी (ऐंशीचं दशक) लिखाण मागितलं. वेळेअभावी जमत नव्हतं. दौ-यावर असताना खोत इकडे घरी आले. याने काही तरी माझ्यासाठी नक्की लिहून ठेवलं आहे, ते शोध, असा अरुणाकडे (माझी पत्नी) त्यांनी हट्ट धरला. तिने हे टिपणांचं बाड शोधून दिलं. खोतांनी जसंच्या तसं अंकात घेतलं. सोबत रेखाचित्रं. त्यांना ती टिपणं आहेत याची कल्पना नव्हती. मजकूर आवडला होता. विश्वासाची भरणी झाली. अंकातील कात्रण काढून ठेवलं. पण पुढे व्यवसायाच्या उलथापालथी झाल्या. वेळ काढणं कठीण झालं. एका आजारपणात वर्ष-दीड वर्ष गेलं. नंतर मात्र गंभीरपणे लिहायला घेतलं. संशोधनात काही दिवस घालवले. प्रवास केला. टिपणांमधून आणि तोपर्यंत लिहिलेल्या मजकुरातून पात्रांची यादी केली तेव्हा पन्नासच्या वर संख्या गेली. धक्का बसला. पण लिहिताना सहजगत्या ती पात्रं आपापली गाठोडी, रंगरूप घेऊन आली होती. नीट तपासून त्यात काही कच्चे धागे नाहीत ना याची खात्री करून घेतली. उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वर्हाडातील नातीगोती फार चिवट आणि नात्याचा हक्क गाजवणारी असतात. किंवा कधी वाटतं, नात्यागोत्याचा पसारा हेच त्यांचं प्राथमिक विश्व. मजकूर लिहिताना बाजूला पात्रं, कुटुंबं यांचे नकाशे काढून त्यांची परस्परांतील नाती व संबंध यांचे गुंतवळेही नोंदले. घटनांच्या तारखा, वार, महिने वर्ष यांच्या नोंदी करून त्यांचे आजूबाजूच्या व्यापक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, जागतिक अशा घटनांशी उल्लेखलेले संदर्भ यथास्थित बसताहेत ना हे डोळ्यात तेल घालून पाहण्याची सवय पहिल्या कादंबरीपासूनच होती. ढोबळ वास्तवात चूक नको, या सवयीची देणगी कदाचित पत्रकारितेमधून आली असेल. मोसमाचे विभ्रम, समुद्राच्या भरती-ओहोटीच्या लाटा, चंद्रकला, तिथ्या, सूर्योदय-सूर्योस्त यांचे घोटाळे होऊ नये याबद्दल माझा कायम कटाक्ष असतो. हस्तलिखित राजहंस प्रकाशनाकडे 1997-98 मधे दिलं आणि पुस्तक 1999 साली बाहेर आलं. म्हणजे डोक्यात घोळण्याचा काळ सोडल्यास प्रत्यक्ष कागदावर उतरवणं सुरू झाल्यापासून तो प्रकाशनापर्यंत किमान पंधरा वर्षं कादंबरीने घेतली. दरम्यान फारसं काही लिहिलं नाही. यात अतिशयोक्ती मानू नये. ’मुखवटा’वर शेवटचा हात फिरवताना वरची बाडं काढली तेव्हा लक्षात आलं, की दुस-या एका महाकादंबरीच्या नोंदी आणि मजकूरही आपण 1991 पासून ठेवतो आहोत. नव्या नोंदी चालू आहेत. पण 1992 साली अयोध्येतील घटनांनी कादंबरीतील मध्यवर्ती सूत्राला प्रचंड धक्का बसला. लिखाण ठप्प. तीन-चार वर्षांनी ते परत सुरू केलं. पण देशाच्या आणि जागतिक पातळीवर घटना अशा घडत राहिल्या की अधूनमधून उत्साह आवरून लेखणी म्यान करणं भाग पडावं. 2001 साली तर मोठीच उलथापालथ झाली. अजून तेच सूत्र स्फुरतं व ते जुने कागद मी बाहेर काढतो. नंतरच्या काही नोंदी संगणकावरही आहेत. तर असो.
या लिखाणावर कोणते प्रभाव आहेत, कोणते स्वीकारले, असं संपादक विचारतात. असे प्रश्न लोक पहिल्या कादंबरीपासून विचारतात. उत्तरं देता येत नाहीत. माझा तसा साहित्याचा अभ्यास नाही. मराठी साहित्याचं पद्धतशीर वाचन नाही. शाळेचं नाव सायन्स कोअर हायस्कूल. विज्ञान व गणितावर भर. नंतर विद्यापीठात पदार्थविज्ञान आणि गणित... त्यामुळे किशोरावस्थेत वाचलेली हरी नारायण आपटे, साने गुरुजी, नाथमाधव, बाबूराव अर्नाळकर इत्यादिकांची पुस्तकं; मासिक चांदोबा, नंतर अधेमधे थोडे खांडेकर-फडके, एवढीच मराठी साहित्याची ओळख. मॅट्रिकला मराठीसाठी मोरोपंतांची ‘केकावली’ मात्र होती. कॉलेजच्या ग्रंथालयात मुंबईचं एक प्रतिष्ठित साहित्यविषयक नियतकालिक येत असे, ते वाचण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही. हे असं नाही, असं नसतं’ असं वाटायचं. आपट्यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’ मधील कोवळ्या वयातील पात्रं कशी गंभीर व पोक्त वागतात तेही चमत्कारिक वाटायचं. गाडगीळ, बेडेकर, नेमाडे, पाध्ये यांच्या पुस्तकांचा परिचय तर फार उशिरा म्हणजे वयाच्या 23-24व वर्षी पुण्याला गेल्यावर.. तोवर घरच्या संग्रहातील महर्षी व्यास, वाल्मिकी वगैरे मराठीतून वाचून झालं होतंच; पण तेथील इंग्रजी पुस्तकांवर डल्ला मारून डिकन्स, टॉलस्टाय, डोस्टावस्की, अलेक्झांडर कुप्रिन, आर्थर कॉनन डायल, सार्त्र, कामू इत्यादी बहुधा पूर्ण न समजता थोडे थोडे वाचले होते. शाळेत मराठी विषय होता. निबंध लिहून घ्यायच्या आधी शिक्षक सांगायचे, या विषयावर मनात जे येतं ते जसंच्या तसं लिहा. कोणाची नक्कल करू नका. ते मनात ठसलं होतं.
त्यामुळे पहिल्या कादंबरीवर (मुंबई दिनांक)देखील प्रभाव कोणाचा होता हे कसं सांगायचं? फॉर्मचा जाणीवपूर्वक विचार करण्याची आवश्यकता वाटत नाही. फॉर्मच्या प्रयोगाने वाचक दुरावतात. कथा जशी सुचते तशी लिहायची. ओढून-ताणून फॉर्मचा आविर्भाव घेतला की कृत्रिमता येते.
’मुखवटा’ गिचमिड आहे. तात्याजींनी लिहिलेली आदिपुरुषाची प्राचीन कहाणी तुकड्या-तुकड्यांनी येते. ती त्यांनी जेव्हा जशी सुचेल तशी लिहिली, त्याच क्रमाने कादंबरीत आली. तात्याजींनी वेगवेगळ्या वेळी, अधे- मधे बराच काळ जात केलेलं त्यांच्या भाषेतील लिखाण कादंबरीच्या भाषेशी विसंगत वाटलं म्हणून ते तिरप्या अक्षरात घेतलं. आपली स्वत:ची काही वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैली आहे, या भ्रमात मी नाही. लिखाणात मी तटस्थ, कठोर असतो असं म्हणतात. प्रत्यक्ष निवेदनात भावुकतेला थारा नसतो. मात्र, पात्रांच्या स्वभावानुरूप सारे भाव यथास्थित येत असावेत. या अशा कोरड्या शैलीचा आणि आकृतिबंधविरहित लिखाणाचा कोणा तरुण लेखकांवर प्रभाव पडेल असाही माझा भ्रम नाही.
तेराव्या शतकात अल्लाउद्दिन खिलजीच्या काही फौजा बर्हाणपूरहून सातपुडा ओलांडून एलीचपूर, वत्सगुल्मार्गे देवगिरीकडे गेल्या. त्या काळच्या मार्गांचा, एकट्या-दुकट्या कुटुंबांच्या प्रवासपद्धतींचा मागोवा घ्यावा लागला. आदिपुरुषाचं कथानक लिहितांना काळाच्या ऐतिहासिक संदर्भांची खात्री करून घेतली. बाकी सुपीक कल्पनाशक्तीवर. तसेच अव्वल इंग्रजी काळातील इंग्रज व स्थानिक लोक यांच्यातील प्राथमिक संबंधांच्या कथा, आख्यायिका ग्रामीण भागात ऐकायला मिळतात. स्वातंत्र्यानंतरच्या आणि महाराष्ट्र निर्मितीकाळातील घटनांना आपण साक्षी होतो. हे कालपट व्यवस्थित प्रतिबिंबित झाले असावेत.
संपादक विचारताहेत, मागे वळून पाहता या कादंबरीबद्दल काय वाटतं? स्वत:ची पुस्तकं वाचणं क्लेशकारक. सुरुवातीला उल्लेखलेल्या गाजलेल्या कादंब-या कधी कामासाठी चाळल्यास त्रास होतो. ’मुखवटा’चं तसं नाही. मनुष्यप्राणी कितीही निरिच्छ होऊन आध्यात्मिक निर्वाणाप्रत पोचला तरी प्राण असेपर्यंत त्याच्यातील सूक्ष्म अहंभाव जिवंत असतो. या ‘अहं’शिवाय तो श्वासही घेऊ शकत नाही. लेखासाठी ’मुखवटा’ चाळली तेव्हा ’अहं’ सुखावला. आपल्या लिखाणावर प्रसन्न होण्याची संधी क्वचितच लाभते. ’मुखवटा’सारखी कादंबरी हातून लिहून झाली याचं समाधानयुक्त आश्चर्य वाटतं. असं क्वचित होतं. ते टिकेल अशी खात्री वाटते. एरवी हा लेख लिहिण्याचा व्याप केला नसता.
-अरुण साधू
दूरध्वनी : 022-26592528
sadhu.arun@gmail.comअरुण साधू मराठी साहित्यविश्वात एक महत्त्वाचे अभ्यासू पत्रकार, कथाकार, कादंबरीकार म्हणून परिचित आहेत. साधू यांनी विविधांगी व भरपूर लेखन केलं आहे. त्यांचं सुरुवातीच्या काळातलं ‘माणूस’ साप्ताहिकातलं ‘आणि ड्रॅगन जागा झाला’, ‘फिडेल, चे आणि क्रांती’ हे समकालीन इतिहासाचं अचूक भान देणारं लिखाण खूप गाजलं. पुस्तकरूपानेही हे लिखाण प्रसिद्ध झालं. नव्वदोत्तर काळातही अशाच प्रकारचं त्यांचं अभ्यासू लिखाण ‘तिसरी क्रांती’, ‘ड्रॅगन जागा झाल्यावर’ अशा काही पुस्तकांतून वाचकांसमोर आलं.
‘मुंबई दिनांक’, ‘सिंहासन’ या त्यांच्या सुरुवातीच्या कादंबर्यांनी मराठी साहित्यविश्वात राजकीय कादंबर्यांचा मानदंड निर्माण केला. पुढच्या काळात ‘बहिष्कृत’, ‘स्ङ्गोट’, ‘त्रिशंकू’, ‘शापित’, ‘विप्लवा’, ‘तडजोड’, ‘शोधयात्रा’, ‘झिप-या’, ‘मुखवटा’ अशा महत्त्वाच्या कादंब-याही त्यांनी लिहिल्या. महानगरातील स्ङ्गोटक सामाजिक स्थितीचं अंतर्मुख करणारं चित्रण त्यांच्या अनेक कादंबर्यांमधून आलं आहे. ‘माणूस उडतो त्याची गोष्ट’, ‘बिनपावसाचा दिवस’, ‘मुक्ती’, ‘मंत्रजागर’, ‘ग्लानिर्भवती भारत’, ‘बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणा-या इमारती’ असे काही कथासंग‘ह त्यांनी लिहिले आहेत. याचबरोबर काही नाटकांचं त्यांनी लेखन केलं असून, काही अनुवादही त्यांच्या नावावर जमा आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा