नाशिकसारख्या छोट्या शहरात कॉलेज रोड, गंगापूररोडवर तरुण-तरुणींचा धिंगाना रात्रभर सुरु असतो. मेट्रो-सिटीज म्हणून नावारूपाला आलेल्या मुंबई-पुणे शहरात याचे प्रमाण अफाट आहे. वास्तविक पाहता आपल्या महाराष्ट्रात ‘सांस्कृतिक स्थित्यंतर’ किंवा ‘पाश्चिमात्य अनुकरणाचा’ पाया हा याच मेट्रो सिटीजमध्ये रोवला जातोय. का ? आपल्या मराठमोळ्या संस्कृतीतही नृत्य, गायन या कला तुम्हाला करमणूक करवून देण्यासाठी समृद्ध आहेतच. मनोरंजन करू शकतीलच परंतु त्यातून विचार विनिमय आणि प्रबोधन करू शकतील असे कित्येक लोककलेचे प्रकार मराठी संस्कृतीत रुजलेले आहेत,(इतर भाषिक संस्कृतीतही आहेत, पण मला ज्यांची पूर्ण माहिती आहे त्याबद्दल मी सांगतो) जसे की भारुड, कीर्तन, अभंग, भजन, लोकगीते, लोकसंगीत आणि नृत्य, जागरण-गोंधळ त्यांना जोपासून, विकसित करून, जतन- संवर्धन करून आपली अस्मिता टिकवून पुढच्या पिढीस देणे हे मी महाराष्ट्रीय किंवा जय भवानी-जय शिवाजी अशी हरोळी देणाऱ्या, नुसताच मराठीपणाचा टेंभा मिरवणाऱ्या प्रत्येक कलंदराचे आदिकर्तव्य होते. मात्र, मराठी/ भारतीय संस्कृती ही परकीय भाषा, परंपरा यांच्या मुसळधार, अविरत अशा भडीमाराने लोप पावत चालली आहे, किंवा तिचे दर्शन दुर्लभ झाले आहे. परवाच आमच्या घराजवळून भारतीय पोशाखात दिमाखात गोऱ्यापान रंगाची, निळ्या डोळ्यांची तरुण फॉरेनर मुलगी जाताना दिसली तेव्हा मात्र आजूबाजूच्या मराठी बाणा विसरून गेल्या मुलींवर हसूच आले मला ! परदेशातील लोक, लोकप्रतिनिधी, उद्योजक आपण भारतीयांची खिल्ली उडवत राहतात, बहुतांश देशात भारतीय नागरिकांना जगताना मानहानी, त्रास होत आहे, आणि भारतीयांनी त्यांच्या म्हणण्यानुसार वागले पाहिजे असा त्यांचा हेका आहे. बळजबरीचा ! मग मला सांगा आपण भारतीय का एक प्रकारे षंढ बनलो आहोत, अगदी सहजपणे आपण परकीय संस्कृती, भाषा, परंपरा स्वीकारतो, अंगिकारतो आहोत. अस्मिता, अभिमान, स्वाभिमान या गोष्टींची जाण काही विशेष प्रसंगात का करत राहतो आपण ? यातूनच पुढे वाढीस लागली आहेत व्यसनाधीनता खासकरून आम्ली पदार्थांचे व्यसन. जर आपण आपलं खरं अस्तित्व सोडून बाकीच्याच मृगजळास असेच भुलत गेलो तर आपल्याला भूरळ पडून, पेढा खाऊ घालून येडा बनविणारेच जास्त भेटतील.
चला एक प्रयत्न करूया, भारतीयांची बदलेली जीवनशैली, पाश्चिमात्य होत गेली आहे, तिला मूळ वैभव प्राप्त करून देण्यासाठी झटूया. प्रामाणिक प्रयत्न करून सुधारणा केली गेली नाही तर भविष्यातील पिढीला भलताच भारत ठावूक होईल, आपली संस्कृती नामशेष झाली तर पुढची पिढी सुसंस्कारी कशी बनेल ? ज्ञानी कशी बनेल ? आजवर वैभव आपण पाहिलं, जपलं त्याचा वारसा पुढे चालूच राहणार नाही. याचे वाईट भोग आपल्यापैकीच अनेकांच्या वंशावळीतील लोकांना भोगावे लागतील. आहात ना तय्यार
विशाल लोणारी, नाशिक
९५२७१३८५०५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा