झालं ! पुढचे काही दिवस तरी ‘एन्जॉय’ हा शब्दच युथच्या डोक्यातून डीलिट होणार. दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होत आहेत ना. मग प्रचंड दडपण, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करत अभ्यास, बदाम-खारीक, आक्रोड, दूध अधिक प्राणायाम, ध्यान, देवपूजा आदी अनंत उपाय... परीक्षेत सर्वोत्तम मार्क्स मिळवून यश मिळवण्यासाठी. आयुष्यात अत्यंत महत्वाचे टप्पे म्हणजे दहावी आणि बारावी. ही दोन वर्ष का महत्वाची, तर इथून आयुष्याला, शिक्षणाला एक नवीन वळण मिळत असते, इथे संपादित केलेले यश पुढे भवितव्य घडविणारे असते, त्यामुळेच मग पुढचे काही दिवस सिनेमा, टीव्ही, रेडीओ, सोशल नेटवर्क, फिरणे, खाणे-पिणे या सगळ्या धमाल मस्तीला फाटा देत अभ्यास एके अभ्यासचा चाप्टर युथवर्गात ऑन असणार आहे. दहावी-बारावी सोबतच पदवीस असलेल्यांचाही येत काळ कसोटी पाहणारा आहे, तेव्हा आज थोड यावर डिस्कस.
मित्रांनो, बोर्ड असो वा युनिव्हरसिटी, ते तुमचे आयुष्याला दिशा देतील, पण तुमची कोण आहात, कसे आहात हे ठरणे काय तुम्हाला मिळणाऱ्या ३५ किंवा ९० मार्कांवर अवलंबून नाहीये. कोणत्याही क्षेत्रात नोकरीसाठी जायचे ठरवल्यास तुमचे मार्क्स किती हे नाही तपासले जात परंतु तुमच्यातली क्षमतेची प्रथम पारख होणार असते. हे सांगण्याचे उद्दिष्ट हेच की जीव तोडून मेहनत करा, खूप अभ्यास करा, आणि परीक्षेतही भरपूर लिहा..... लेकीन डोक्याला शॉट लावून न घेता. ज्यांचे मार्क्स खूप जास्त असतील ते कमी मार्क्स असणार्यांपेक्षा दोन दिवस जास्त जगणार आहेत का ? अजिबात नाही ना. निसर्ग, सृष्टी तुमचे मार्क्स बघून तुम्हाला आनंद किती द्यायचा हे ठरवेल का ? प्रचंड अभ्यासांती मोठ्या यशाची अपेक्षा नक्कीच ठेवली जाते पण जर ती फळाला आली नाहीच तर काय एकच पर्याय उरतो का ... आत्महत्या ? मुळीच नाही. तेव्हा आयुष्याला आयाम देण्याचा विचार वेगळ्या पद्धतीनेही होऊ शकतो, परीक्षेतले यशच सर्वकाही नाही.
आणि जर कधी वाटलंच की मी मरून जावे, तर शांतचित्ताने एकाग्र होऊन मित्रहो स्वतःशीच बोला, अगदी प्रामाणिकपणे बोला. हे स्वतःच स्वतःला समजून घेणे खूप उपयोगाचे असते स्वतःशी बोलताना आतमध्ये तुमच्या हल्लकल्लोळ होईल, बरचं काय-काय ऐकू यायला लागेल. पटणार नाही अशा गोष्टींचा सूर ऐकू येईल, सगळं काही होऊ द्या, तुमचा ‘आतला’ आवाज ऐका, जाणीवपूर्वक ऐका. हा घालमेल करणारा अंतर्नाद तुम्ही इथे का आहात, तुम्हाला काय करायचे आहे, जगण्यामागचे खरे प्रयोजन काय याचे प्रांजळ उत्तर देणारा असेल, तो ऐकल्यावर पुढे काय होईल हे सांगायची गरज आहे का ? स्वतःवर आणि जन्मदात्यांवर विश्वास ठेवा. आयुष्याच्या परीक्षेसाठी खूप शुभेच्छा.
विशाल लोणारी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा