कट्टा. कट्टा म्हटलं की आठवते ते गप्पागोष्टी करण्याचे ठिकाण. एक अशी जागा जिथे माणसे जमतील आणि चार सुख-दुखाच्या, हित-अहित, संधी, संशोधन, मार्गदर्शन अशा अनेक गोष्टींची बोलून देवाणघेवाण करण्याची जागा म्हणजेच कट्टा होय. ग्रामीण भागात आजही मंदिरांच्या बाहेर झाडाला गोल चबुतरे बांधलेले दिसतात, त्यांना ‘पार’ असे ही म्हटले जाते. मुंबई शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या बाहेर कलाकारांचा असंच एक कट्टा आहे. जिथे नाटक, चित्रपट, मालिका आदींशी संबंधित कलावंत, तंत्रज्ञ एकत्र जमतात, आणि फावल्या वेळेत चहाच्या घोटासोबत नवीन माहिती, संधीयाबाबत चर्चा, मत-मतांतरे रंगतात. नाशिक सारख्या फिल्मी दुनियेत नव्याने ओळख निर्माण करू पाहणाऱ्या शहरातील कलाकार मुंबईत संधी शोधायला म्हणून जातात पण फसतात. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे कलाकारांच्या उत्साहावर पाणी फिरते, आणि चंदेरी दुनियेत काही तारे उगवण्यापूर्वीच निखळून जातात. नाशिक शहराचे, येथील कलाकारांचे होणारे नुकसान टळावे, कलागुणांना वाव मिळावा हा सामाजिक हेतू मनात ठेवून राजेश भालेराव, अरुण गिते, विजय दीक्षित, रफिक सैय्यद आदी नाशिकच्या नाट्य-चित्रपट संबंधित कलाकारांनी एकत्र येऊन नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात ‘आर. के फिल्मी कट्टा’ ही संस्था सुरु केली. कलावंताचे पार म्हणून ‘फिल्मी कट्टा’ असे या संकल्पनेचे वर्णन दिग्दर्शक राजेश भालेराव करतात. नव्या पिढीतील हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठीची जिद्द, प्रेरणा, स्फूर्ती आणि अर्थातच व्यासपीठ मिळवून देण्याचे सेवाभावी कार्य हे फिल्मी कट्टा करते आहे.
निव्वळ झगमगाट आणि प्रसिद्धी, लोकप्रियता यांच्या मागे न लागता वाचिक अभिनय, दिग्दर्शन, कथा- संवाद लेखन, निर्मित्ती कौशल्य, डबिंग, संकलन, कॅमेरा व दृश्य चित्रीकरण अशा सर्वच कलांची इत्यंभूत माहिती आणि त्या विकसित करण्यापासून प्राविण्य प्राप्त करण्याकरीता आवश्यक असणारे सखोल मार्गदर्शन फिल्मी कट्टा नेहमीच करत असते. तुमच्यात कलेची खुमखुमी असणे हीच या संस्थेची प्रवेश फी आहे. इथे प्रवेश घेतल्यावर पुढील सर्व शिक्षण हे विनामूल्य प्रदान केले जाते. शहरात कुठेही ऑडिशन असतील तर त्याची माहिती व्हॉटसअॅपद्वारे सांगण्यात येते.
फिल्मी कट्टा फक्त मार्गदर्शनच देते असे नाही, तर येऊ घातल्या काळात संपूर्णतः व्यावसायिक पद्धतीने स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ यांना सोबत घेउन ‘गाव तसं चांगलं’ या मालिकेची यशस्वी निर्मित्ती करण्याचा वसा संस्थेने घेतला आहे. मालिका प्रक्षेपणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर नाशिक शहरातले चित्रीकरण असलेली ‘गाव तसं चांगलं’ दाखल होत आहे. मालिकेच्या कथानकाबद्दल लवकरच गोष्टी उजेडात येतीलच.
सामाजिक कार्यातही फिल्मी कट्टा मागे नाही. मग गंगापूर गावाजवळील ‘जलालपूर’ गावाच्त राबविलेली स्वच्छता मोहीम असो, नाशिक शहरात आयोजित करण्यात आलेलं रक्तदान शिबीर असो. समाजप्रती आंतरिक तळमळ, आपण समाजाचे काहीतरी देण लागतो ही भावना येथे सहभागी असलेल्या प्रत्येक कलाकाराच्या मनात रुजलेली आहे.
विशाल लोणारी, नाशिक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा