खरं सांगू का ? काही लोकांचे असे होते की मनाप्रमाणे त्यांना सहजच शब्द वळवता येतात. त्यांचे उच्चार करायला लागणारा वेळ इतका कमी वा अधिक कसा काय ते घेऊ शकतात, याचे मग भारीच कौतुक मला वाटून जाते. परंतु मित्रांनो, अंतिम सत्य हे की हे सगळेच देवदत्त असते. निसर्गाने जी रचना केलेली असते हा तिचाच एक भाग आहे. एखादा शब्द उच्चारायला लागणाऱ्या वेळेप्रमाणे आपण बोलून तो लिहितो. या दात, ओठ आणि जिभेच्या हालचालींवर तो ह्रस्व की दीर्घ उमटेल हे अवलंबून आहे. आता, आज अचानक हे सगळं मला सुचायचं कारण आहे मी वाचत असलेलं पुस्तक, या पुस्तकातील लेखकाने संपूर्ण स्वातंत्र्य वापरून सुरुवातीपासूनच मनाजोगे शब्दांना वळवले असल्यामुळे मला वाचयला थोडा त्रास झाला, पण मग वरील विचारही डोक्यात आले, पण तो तांत्रिक विचार झाला हो ! अजून एक गंमतीची गोष्ट सांगू का ? कथा, स्फुट, पत्र आणि कविता या वाचणार्यांच्या काळजाला तेव्हाच हात घालतात जेव्हा लिहिणाऱ्याने बुद्धीप्रामाण्य न मानता उत्स्फूर्त मनानेच विवेचन केले असेल. आता यापुढे त्या कथासंग्रहात लेखक मला काय सांगुन गेलाय ते मी मांडणार आहे.
प्रस्तुत पुस्तकात लेखकाची पहिली कथा जी मी वाचून काढली. ती अकरा पानांची लघु कथाच म्हणावी लागेल. लघु यासाठी कारण की कथेचा प्रवाह हा मुळात प्रवाहच नाही, घटना आणि पात्रही जास्तीचे नाही. एका अनंतरावांची गोष्ट यात कथाकाराने सांगितली आहे. हेडक्लार्क म्हणून ‘साठाव्या’ वर्षी स्वेच्छानिवृत्ती(?) ही लेखकाने कल्पनेची उंच भरारीच म्हणायला हवी. सदर कथेत अनंतराव हे त्यांच्या स्वतः विषयी फार काही बोलत नाहीत, जितकं ते सांगुन जातात त्याने खरचं त्या अनंताचीही कीव करावीशी वाटते, असो. ही एक न पटणारी गोष्ट आहे. सदर कथेतील ज्या रमाबाई आहे त्यांनी इतिहासातील सर्व ‘रमा’ पात्रांच्या प्रतिमेस साफ धुवून टाकले आहे. लेखकाची रमा लक्षात राहते, निम्म्याहून अधिक वेळा रमाच्या स्वभावातील करडी बाजू आपल्यापुढे येत असल्यामुळे या कथेत ती अशी कशी वागू शकते ? असा प्रश्न साहजिकच सतवायला सुरुवात करतो. बरं पेन्शनर होण्यापूर्वीची बायको आणि आता सूनबाई, मुलांत नवऱ्याला एकदम टाकून दिल्यासारखी, दूर्लक्ष करणारी, अरसिक बनलेली, आणि जरा तिच्याशी मायेने वागायला गेला अनंतराव तर त्याला झिडकारून समाजभानाच्या गोष्टी ओरडून सांगतेच कशी ? जेव्हा हीच बायको अनंतराव जेव्हा नोकरी करत होते त्यावेळी मात्र नवर्याची लाज ही रमा काढत नव्हती, मनात असलेल्या ‘कमवत्या’ या स्थानेचे भान ती बाळगत होती. संसारदक्षता, कृतीदक्षता तिच्यात होती. पण एकदम अनंतरावांना निव्वळ ‘आता उरलो स्वतःपुरता’ जे जसे आहे तसे स्वीकारून सुखी मानून जगावे इतके क्लेशदायक जगावे लागणे. रमा यांच्यातला हा बदल निमूट त्यांना सहन होणे, या सगळ्याच गोष्टी म्हणजे लेखकाने वाचणार्याला दिलेली प्रायर शॉक ट्रीटमेंट म्हटली पाहिजे, पहिली नाही हं; दुसरी कारण आपल्या डोळ्यांना दिसण्याला सुलभ अशा शुद्धलेखनात हे वाचता न येणं हाच खरतरं पहिला ‘झटका’ होता.
कसं असतं ना, सिनेमा, नाटक, एकांकिका, मालिका या आपल्या रोजच्या जीवनातल्या भाग आहेत. हे आपण एन्जॉय करतो, पण त्याचेही काही मापदंड आहेतचं ना ? सरसकट सगळ्यांसाठी नसतीलही पण बऱ्यापैकी सटीकतेवर विश्वास असणाऱ्यांचे असतात बुवा ! पण आज जेव्हा यांना फाटा देऊन हे छोटेसे पुस्तक वाचायला घेतले, चला जरा वेगळेपणा जीवनात येईल म्हणून पण घडलं ते भलतंच. मी हे असे मुद्दामहून केले ते यासाठी की मेंदूला, मनाला चमचमत्या अव्याहाताच्या अतिनीलतेपासून लांब नेत एखाद्या अंधार खोलीत मंद समईच्या उजेडात स्वतःच्याही मनात समईचं दिव्यत्व परावर्तीत होईल आणि पुन्हा नवीन काही संप्रेक्षण नोंदवता येईल, जे वाचून सदर लेखकाला बरंच बरं वाटेल, असा करायचं ठरवलेलं. मात्र, यातील पात्र, त्यांचे वागणे हे त्या मालिका, नाटक आणि सिनेमांसारखे वाटलेत हो ! बहुतांशवेळा ते असे खूप बटबटीत वाटतात, अनाठायी, अकल्पित, अतिरंजित वाटतात.
गृहकृत्यदक्ष, संसार सांभाळणारी, नवऱ्याला जीव लावणारी बायको एकदम त्याचा घरातल्या कोंडमाऱ्यात एखादी रद्दी पडून राहवी तशी टक्क(!) तसे गणते, ती एकेकाळी हेडक्लार्क असणार्या नवर्याला नगण्य मोजते, शोपीस बनून तोही निमूट ठेविले अनंते तैसेची राहतो, असे नसते हो !!!!! अर्थात कल्पनेत काहीही घडू शकत असले तरी एवढं टोकाचे वागणे, व्यक्तिमत्वात अचानक असे बदल घडून येणे, शक्य नाही.
शेवटी औपचारिकपाने सांगू इच्छितो वर जी समीक्षेच्या आसपास जाणारी कळवळ मांडली ती श्री. अरुण देशपांडे सरांच्या लेखनावर होती. ठरवून बसलोच नाही लिहायला की त्यांच्यावरच लेख मांडायचा. पण जेव्हा मी कथा वाचू लागलो तर हळूहळू स्फुल्लिंगही चेतायला लागले म्हणून हा सगळा खटाटोप केला/झाला. नमस्कार !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा