महाराष्ट्र हरवला आहे!
अगदी सोप्प झाले होते सगळंच. जेव्हा तुम्ही एव्हरेस्ट सर केलात मग तरी इतर डोंगर-टेकड्या सर करायला फार ताकदीची, कष्टाची आणि वेळेची गरज नव्हती. १६ मे या दिवशी भारतात नवा इतिहास रचला गेला होता आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला होता. थोड्या ताकदीच्या घटक पक्षांसमवेत महायुतीची ताकद तयार झाली होती. भटक्या विमुक्त जाती, मुस्लीम, मध्यम कनिष्ठ जाती या सगळ्यांची मोठ बांधून मुंडे साहेबांनी महायुतीचे सोशल इंजिनियरिंग करून टाकले होते. परंतु आता त्यांच्या आकस्मिक अनुपस्थितीमुळे जो घाव जनतेला बसला होता त्यावर येत्या १५ तारखेला आघाडी सरकार बुडवून औपचारिक मलमपट्टी होणार होती. प्रचार १२ दिवस झाला काय अथवा दोन दिवस झाला काय, जनतेच्या मनात निकाल तयार होता.
पण आधीच घोडेस्वार असलेल्या भाजपचे सरदार आता अधिकच हिंदाकाळू लागले. त्यांच्या अंगभर वीरश्री संचारली. मोदी आणि सहा ही जोडगोळ उठली आणि त्यांनी घटक पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला. एका मागोमाग एक गुऱ्हाळ लावून चर्चा दवडत शेवटी युती तोडलीच एकदाची. युतीसोबत महायुतीही तुटली. मिरर इफेक्ट होत आघाडीही तुटली. आणि आता पंचरंगी सामना होणार आहे, जो भाजपला जड जाईल. आघाडीला पुन्हा सत्तास्थापनेचे वेध लागलेत, पैशांचा पाऊस कोसळायला लागला, काहीही घडू शकणे शक्य आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली याला कारण भाजपची आकांक्षा लालसेत परावर्तीत झाली हे होय. भाजपचा अहंगंड ठरतो.
यानंतर भाजपने नव्या चाली खेळत सेनेला एकदम चेकमेट करून टाकले. घटकपक्षांच्या सोबतीने सेनेशी युती तोडून टाकली. वरून ‘आम्ही सेनेवर बोलणार नाही’ असा लबाड आव आणला. शिवसेनेचा वाघ मात्र डरकाळ्या फोडू लागला, सपासप वार सेनेच्या बाणांनी होऊ लागले. खरेखोटे यांचे गणित मांडले गेले. दोस्त आणि यार असलेली मंडळी, एकत्र कटिंग चहा पिणारी यारी आता त्याच चहाचे ग्लास फोडून फेकून मारू लागले आहेत. उमेदवार पळवणे, अगदी लज्जास्पद अशी पक्षांतरे, आणि हीन पातळीचे आरोप यांना ऊत आला. आजवरच्या गृहीतकानुसार ही खेळीही ‘साहेबांचीच’ अशी पवन झुळुकही वाहून गेली. असो, आपण तरी काय करू शकतो ? मतदारांना गृहीत धरायचं आणि वाटेल ते चाळे लाज-शरम सोडून निवडणुका म्हणजे पोरखेळ करून टाकायचा इतकंच सर्वपक्षीय राजकारण आहे. त्यामुळे महाराष्ट्र मात्र नाराज आहे.
भाजप आणि मोदी, मोदी आणि भाजप नाही, खरेतर भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे फक्त मोदी. फक्त मोदी म्हणजे देश जिंकून आता महाराष्ट्र एका पावुलात जिंकणार अशी मग्रूरी भरलेले माननीय पंतप्रधान. सर्वसाधारण मतदारांत भाजपची छाती गर्वाने फुलली आहे आणि त्यात अति आत्मविश्वासाची हवा आहे.
मागेच झालेल्या पोटनिवडणुका स्पष्ट ठणकावून गेल्या की मोदी यांचा करिष्मा, जादू यावर तुम्हाला महाराष्ट्र जिंकता येणार नाही. पण विरोधक ही संकल्पना जणू आपल्यासाठी नष्ट झाली आहे अशा थाटात मोदी सध्या आहेत. मोदींच्या लोकप्रियतेवर महाराष्ट्र उचलून घेवू या भ्रमात भाजप सध्या आहे, त्याला पाठींबा द्यायला मोदी-शहा ही जोडी आहेच. अहंमन्य वृत्तीने पराभवाने न डगमगता आपल्या चुका झाकायचे आणि बाकीच्यांच एवढ्या मोठ्या करायचा की त्यात आपली ‘चूक’ आपल्याला बोचायला नकोय.
गेल्या २५ वर्षाच्या युतीला तडा गेला नसता, मग भाजपचा जयघोष काहीसा “ बाळासाहेबांचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ” पण विनाशकाळाची विपरीतबुद्धी भाजपला मदमस्त करून गेली आणि मग यांना लालसेपोटी शिवभक्ती जागृत करावी लागली. नाहीतर एकदम ‘राम’ भूमिका सोडून छत्रपतींच्या पाया मोदी यांनी पडल्याच नसत्या. दुधाची बशी सफ्फाचट करून मग आता मिशा पुसत बसलेला बोक्याप्रमाणे भाजपची प्रतिमा दिसू लागली आहे.
नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रानेच नव्हे तर दक्षिण आणि काही पूर्वभाग वगळून संपूर्ण देशानेच विश्वासपात्र ठरवले, ते जायंट नव्हे तर मेगा जायंट हिरो ठरले. मात्र स्वकीय लोकांनाही दूर लोटत आता त्यांनी एकच नारा दिलाय ‘मी आणि फक्त मीच !
यांची अजून एक इब्लीस तऱ्हा म्हणजे शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्याविषयीचा आलेलं भरतं, ही नवीन चित्रपट ट्रेजडीच जणू. खरंच जर मुंडेविषयी कळवळा होता तर मग, लोकसभेच्यावेळेसही कशाला महाराष्ट्रभर फिरलात ? मुंडे होतेच ना ! मुंडे साहेबांची एवढी ताकद मनात असलं तर मंत्रिपद देताना मात्र उथळ पाण्याला खळखळाट फार असे का झाले ? मुंडे साहेबांची राखही सावडली नव्हती की त्यांचे खाते तातडीने गडकरी यांचाकडे सुपुर्दही झालीत ! संपूर्ण प्रचार मुंबई आणि महाराष्ट्र अशा दोन उल्लेखांनी रंगतोय, मुंबई ही काय महाराष्ट्र राज्याबाहेर आहे का ? की मुंबईच्या निवडणुका वेगळ्या होणार आहेत ?
मोदी साहेबांनी आता भाषणबाजी पुरे करावी, स्वप्रेमाच्या रोगावर जालीम ईलाज करून देशकारभार करावा. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ‘दागी’ लोकांना थारा नाही असे सांगणाऱ्या भाजपचा अध्यक्षावर डझनवार गुन्हे आहेत. तर भ्रष्टाचारामुले राजीनामा द्यावे लागलेले वादग्रस्त आणि जातिग्रस्त असे येडीयुरप्पा उपाध्यक्ष आहेत. तेव्हा अजून किमान एक वर्ष भारतातील जनता मोदी यांची आत्म भक्ती कीर्तने श्रवतील नंतर मात्र ते ही सारा ताळेबंद दाखवायला लावतील
.
आणखीन एक विचित्र पण गंभीर तितकंच उपरोधक, हास्यास्पद असा मुद्दा. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, अपक्ष, लोकसंग्राम अशा पक्षातील भाजपनेच भ्रष्ट ठरवलेल्या नेत्यांना उमेदवारी देवून या निवडणुकांना इतिहासाच्या पानात लाजिरवाणी नोंद करून ठेवली आहे. कंबरेच सोडून डोक्याला गुंडाळण्याचा हा प्रकार आहे. यावर मात्र ह.भ.प नरेंद्र फडणवीस महाराज यांचे समन्वय, तडजोड, क्षमा आणि पापक्षालन यांवरील कीव आणणारी निरुपणे महाराष्ट्राने ऐकली आहेत. यातही पुढे काही पुराण येऊ शकत याची मात्र दाखल घ्या हो !
ज्यावेळेस आघाडी सरकार होते बेबंदशाहीचे तेव्हढेच विरोधक सेना-भाजप निष्क्रिय होते. भ्रष्टाचार जो माध्यमांत उघड झाला तो आघाडीच्या अंतर्गत कलहातून, त्यात भाजपची मर्दुमकी शून्य ! पण केंद्राला जसे लोक विटले होते तसेच इथे राज्यातही लोक विटले आहेत. महायुती हाच सक्षम पर्याय त्यांना दिसत असताना २५ वर्षच्या दोस्तीला फाटा फोडत महाराष्ट्राची गाय परत एकदा गुजरातच्या दावानीत बांधायचा मोदी आणि कंपनी यांचा मनसुबा दिसतोय.
मात्र, तरीही ‘कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा’ या खड्या सवालाला महाराष्ट्रातील जनता ‘योग्य जागी नेऊन ठेवेल महाराष्ट्र तुम्हाला’ असे खणखणीत उत्तर देईल. कुठलाही मीपणा महाराष्ट्र कधीच खपवून घेत नाही याची मिडी साहेबांना प्रचीती यायलाच हवी.
आघाडीला लोकसभेत चपराक लगावली होती, भाजपला इत्यक्यात लगावी लागेल असे वाटत नव्हते पण आता नाईलाज को क्या ईलाज ?
शेवटी एक गम्मत, रामदास आठवले म्हणाले की मोदी हे बुद्धाचाच विचार मांडत आहेत ! मोदींचे बोधिवृक्ष आठवलेंना नक्की सापडला कुठे ? सिद्धार्थाप्रमाणे त्यांना तपस्चर्या करताना कुठे पहिले ? दया, सच क्या हे इसका पता लगावो !
कानपिचक्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा