विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

article on elections



इंजिन पडले ‘बंद’, कमळ ‘बेधुंद’


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार!! आजच्या टीव्ही आणि उद्याच्या पेपरमधील हीच मुख्य बातमी, याच आशयाचा मथळा, आणि पुढे इतिवृत्तांत. पण याच निवडणुकांमुळे मला घडल्या आणि घडणाऱ्या घटनांचा लेखाजोखा घ्यायची जबाबदारी खांद्यावर पडली आहे, असो आता होऊनच जाऊ द्या!! (खर्च नको रे बाप्पा, खिशाला परवडत नाही...) निवडणूक आणि राजकारण म्हटले की त्यात अनेक गोष्टींची राजकीय गुंफण असते, अगदी सर्वसामान्य कार्यकर्ते, समर्थक ते पदाधिकारी ते नेत्यांपर्यंत. सगळ्या सगळ्या पात्रांची अतिशय चिवट खेळींची सरमिसळ झाल्याने, राजकारणात घडणारी प्रत्येक घटना ही महत्वाची असतेच, परंतु बर्याचदा ती रंजक, रोचक अशी ठरते. राजकारण हे एकमेव असे क्षेत्र आहे ज्यावर महाराष्ट्रातला शाळेत जाणारा शेंबडा पोरगापण टिप्पणी करून जातो, माझ्या संपर्कात अनेक असे धडाडीचे माणसे आहेत ज्यांना त्यांच्या ‘साहेबांचा’ अपमान कधीही सहन होत नसतो. ज्यांचा खरोखर त्यांच्यावर श्रद्धापूर्ण विश्वास असतो... कदाचित तो डोळस असावा.... असो. (या मोबाईलचा मला फार राग येऊ लागलाय, नेमकी तंद्रीभंग करणे याला अचूक जमते, माझ्या तंद्रिस्त होण्याच्या वेळाही बेट्याने पाठ करून ठेवल्यात, अचूक वेळी खणखणतो) आजचा विषय मात्र काही कार्यकर्ता आणि नेता हा नाही. झेंडा चित्रपटाचा पुढचा भाग लिहायची गळ ही मला गुप्तेंनी घातलेली नाही, पण तरीही लिहावे लागणार आहे.

 माझ्यातल्या संवेदनशीलतेला पाझर फुटतच असतो म्हणून आणि विषय हा जनसामान्यांशी निगडीत असा आहे म्हणून. राजकीय विश्लेषक नसतानाही माझ्याकडे राजकारणावर बोलण्यासारखे काही आहे यावर ठाम विश्वास ठेवावा आणि पुढे वाचीत जावे. (लेख संपल्यावर ‘खंड’ पाडाल तर बरे वाटेल.)

तर आज लिहिणार आहे एक वृत्तांत, मागच्या काही दिवसात माझी झोळी खांद्यावर टाकून उन्हातान्हाची पर्वा न करता, कशाची ही किंचित तमा न बाळगता मखमलाबाद शिवारापासून ते आनंदवल्लीच्या टोकापर्यंत जाणूनबुजून केलेल्या प्रवासाचा, लोकांशी हेतुपूर्वक आलेल्या जवळून संबंधांचा हा आढावा, अगदी शेवटापर्यंत मी रोमांचाने भारावत गेलो, ते आलेल्या अनुभवामुळे, त्याची किमान प्रचीती लोकांना यावी याकरिताच असणारा माझा शब्दांचा अट्टहास ! नाशिक शहर आता झपाट्याने वाढू लागले आहे, सुधारणा या  शासनाकडून झाल्या नसल्या तरी इथल्या मजुरांपासून ते व्यावासायिकांपर्यंत त्या होण्याला सुरवात झाली आहे. प्रत्येकजण इथला स्वहित पाहत आमूलाग्र बदल घडवू लागला आहे. एकतर केंद्रात लोकमान्य राजश्री विराजमान झालेत. परंतु त्यांनीही मग तीक्ष्ण बुद्धी आणि खेळीचे वार करायला सुरवात झाल्यावर भरीसभर विविध देशात जावून ‘स्वदेश’ आणि ‘परदेस’ यांची तारीफ केल्याने एकीकडे ज्वाज्वल्य अभिमान आणि विकासाची पुनश्च जागृतलेली आस असे चित्र राज्यात पाहायला मिळतंय, नाशिकही अपवाद नाही.

सर्वात प्रथम आपण  महानगराचा विचार करूया. गेल्या महानगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांना लोकांनी जोशपूर्ण भाषणे आणि तडाखेबंद भाषा शैलीला हिरवा कंदील दाखवत सत्ता मिळवून दिली. त्या मंतरल्या दिवसात सुजन नाशिकवासियांना सुस्वच्छ त्याहूनही अधिक सुरक्षित नाशिकची स्वप्ने पडायची आणि ती मनसेप्रमुख आणि त्यांचे शिलेदार नक्कीच पूर्ण करतील अशी भाबडी खात्री होती. परंतु सुजन असणारे नाशिककर आता सुजाण झालेत आणि आता मात्र महाराष्ट्राची सूत्रे मनसेच्या हातात द्यायला साफ नाही म्हणत आहेत.(शंका असणार्यांना कंसमामाचा सल्ला, आकडेवारी उपलब्ध आहे, तपासून घ्या.) मी ज्या कुठल्या घरात मग ती झोपडपट्टी असो वा अलिशान बंगला गेलेलो सर्वांनी मनसेला नावे ठेवलीत, अगदीच आपल्या परिचयाची परंतु चारचौघात वाभाडे निघायला..  नको म्हणून सांगत नाही. लोकांनी साफ असेच नमूद केले की आमदार यांचे कार्य समाधानकारक नाही. रस्ते खोदणे, खड्डे बुजवणे आणि बाकडे बसवणे यातच नाशिकचा विकास पाहायचा का ? असा सवाल मलाच विचारला, एकदोन अण्णा, अप्पा, भाऊ, दादा, काकी यांचे ते रागीट चेहरे पाहून मी तर त्याबद्दल विचारणे सोडून दिले. चेहरा सुजला असता तर’’! काही गम्मतीदार अनुभवदेखील मी घेतले. विशेषतः पंचवटी, स्तंभ, इकडे गंगापूर रोड, एस टी कॉलनी, गिरणारे-मखमलाबाद रोड आदी बरीच ठिकाणे अशी होती जिथे आमदार कोण ? याचीच मुळात लोकांना कल्पना न्हवती. माझ्याकडून जाणून घेतांना कुतूहल आणि उत्सुकतेची परिसीमा एका इंजिनाच्या लांबीइतकी मोठी झाली असेल. बरे या लोकांना महानगरपालिकेचेही काम समाधानकारक वाटत नाही, त्यामुळे उर्वरित काळात राज साहेबांनी भरीवपणे चालू, अर्धवट आणि आश्वासित केलेली कामे पूर्ण केली नाहीत तर मात्र सत्ता हातून जाण्याचीच( विधानसभा तर गेलीच, भविष्याचाही विचार मांडतो) चिन्ह घराघरातून दिसतंय. आता इंजिनला स्वतःच्याच उडालेल्या धुरामुळे सगळे अंधुक चित्र पाहायला मिळणार आहे हे निश्चित. लोकांनी तुमचे नगरसेवक नाकारले, आमदार नाकारले आणि परिवर्तन पुन्हा एकदा उच्चारले. ही बाब खचितच तुमची ‘शिट्टी’ वाजली हे सांगतेय, ती ऐकावी. आणि पुढील ‘रूळ’ कोणता असेल यावर विनिमयन करावे. उर्वरित काळासाठी महापौर कुठल्याही पर्यायाने निवडला तरीही तो खरोखर नाशिककरांचा मनसेने गमावलेली प्रतिष्ठा मिळवून देवू शकेल ?

आता, आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आणि सबंध भारत देशाला आपल्या बाण्यातून, बोलण्यातून आणि लोकांना स्वतःशी घट्ट बांधून ठेवण्याच्या कसबामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रवक्ता बनवणार्या राष्ट्रवादी या दिलदार पक्षाचा ताळेबंद आखण्याची ‘घडी’ आली आहे. हा लेख मी अंतकरणापासून लिहित आहे. माझ्या काकांनी सांगितलेल्या योग्य मार्गावरून जाताना मला अनेक ताई, दादा आणि पाटील भेटले. माझ्या प्रश्नांवर उत्तरे देताना त्यांचेही काळीज पिळवटून निघत होते. एक म्हातारे गृहस्थ ( रिटायर्ड) तर केवढी तरी तारीफ करत होते, मला वाटले त्यामुळे हर्षभरित झालेल्या मला ‘चहा’  विचारतील, पण ‘पाणी’ पण पाजले नाही. पाण्यावर का अजूनही नाराज. आणि चहाचा तो ‘राग’(खुशमस्करी बस्स !) तर चला पटकन मुद्दा मांडतो. राष्ट्रवादी आणि त्यांची आघाडी यांचे मिळून जे राज्यसरकार महाराष्ट्र उपभोगत आहे त्याची जनतेला मात्र कट कट वाटू लागली आहे. कामे दाखवणाऱ्या चित्रफितींची टिकटिक तर अगदीच मधूर असूनही ठराविक जागांचा विकास घडल्याने डोक्याला तापदायक ठरली आहे. अगदीच खोटारडी जनता आहे, असे  एकवेळ मानले तरी गावे आणि शहरांत तापणारे पाणीप्रश्न कसली साक्ष देतात ? राज्यात्तील कामगिरी समर्थनीय नाही असा लाल शेरा देवून लोक कधीच भडकून बसलीत, नाही म्हणायला एक दोन घरी अशी मिळाली की ज्यांना केंद्रातील नव्या सरकारने निराश केले म्हणून ते तुमच्याकडे कौल देणार, किंवा आमच्या गावाकडे अमुकतमुक राष्ट्रवादीचा आहे म्हणून अजितदादा यांना मुख्यमंत्री बनविण्याचा विचार करणारी एक दोन घरे आहेत, परंतु लाखांपुढे नगण्यच की!. मला समजून आलेले आजवरचे राजकारण हे की या  पक्षाने कामे केलीत. मी या गोष्टीला साक्षीदार आहे. कामे करताना  मात्र लोकांना अभिप्रेत विकास न होता बड्या नेत्यांचे स्वबळ फुगले आणि लोकांच्यातोंडी अजूनही कर्पलेली काळी भाकरीच आली. यामुळे लोक संतापले, चिडले आणि भयंकर रागावले. आता उठून केल्या कामांना आकर्षक पद्धतीने सादर करायची दुर्दैवी नामुष्की जी आली ती याचमुळे. माझ्या सर्वेक्षणात सर्वात अत्यल्प पसंती राष्ट्रवादीला आल्याने मी ही खरंच खूप सुन्न झालेलो. काही कार्यकर्त्यांचेही मत मी जाणून घेतले, त्यांच्या म्हणण्यानुसार जो उद्योजक वर्ग आहे, तो आजही एनसीपीलाच पसंत करेल, आणि जो विरोधात आहे तो निव्वळ जातपातीच्या राजकारणामुळे. हास्यास्पद आहे, जात की पोट ? खायला मिळत नसेल, उपाशी निजायची जर पाळी येणार असेल तर का राष्ट्रवादी कुणाला वाली वाटेन. असंबंध आणि अनेकदा असौहार्द्पूर्ण, असंवेदनशील बोलाचाल यामुले लोक किटलेत, इतर कारणे सांगणे हे एनसीपीचे सत्यापासून भिवून पळणेच झाले. यंदाच्या विधानसभेत तरी राष्ट्रवादीला सत्तेची लालसा होऊ नये, देशाचा कैवार उचलेल्या पक्षात मनाची आघाडी केली जनता, आता त्यांना भुलणार नाही. कामांसोबत जनसामान्यत्व आणि त्यांचा सर्वांगिक विकास असे धोरण जर या लोकांनी स्वीकारले असते, तर लोकांची काय बिशाद होती भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे आरोप करण्याची. विचार व्हावा. महाराष्ट्रात राष्ट्राबद्दलची आपुलकी आणि विकासाची कास धरून राजकारणात स्वतंत्र अस्तित्व बनवत भव्य स्वरूप आणि प्रतिमा स्थापित पक्षाची, राज्यातल्या एका सर्वार्थाने उत्कृष्ट, अभ्यासू आणि प्रचंड मनुष्य ताकद असलेल्या व्यक्तीमत्वाचा येणाऱ्या काळात दारूण पराभव होणार ही कल्पनाच माझ्या अंगावर काटा आणणारी आहे. फक्त नेता चांगला असून भागत नाही, तर राजाचे  शिलेदारही तेवढे काळजीवाहू असावे लागतात, हे माझ्यासारख्या उमद्या तरुणाला वाटू शकते आणितो आपल्या पक्षाला नाकारतोय  यातंच सगळं आलं.

माझ्या लहानपणी, मला आठवते मी, दादा, मित्र आम्ही सारेजण एक खेळ खेळायचो. घोळाची काडी तोडायची आणि ती गोलाकार थोडी वाकवून दोर्याने बांधून द्यायची की झाला आमचा धनुष्य तैयार. दुसर्या काड्यांना ‘बाण’ असे संबोधले की ‘धनुष्यबाण-धनुष्यबाण’ खेळ सुरु. हा खेळ आठवण्याचे एक विशेष असे कारण म्हणजे आजचा आपला चर्चेचा विषय. या लेखात ‘शिवसेना आणि नाशिक’ यांचे काय नात उरलंय याचा अंतर्भाव करणे हे प्रस्ताविकच आहे. तर...या दशकाच्या नाशिकमध्ये शिवसेना हा पक्ष अनोळखी झाला आहे. आदित्य ठाकरे त्याच्या अलिशान मोटारीतून कॉलेज रोडला येतो पण ती जमणारी गर्दी(तरुणी,तरुण दोघांची) प्रसिद्धी वलय असल्याने होते, तो भावी नेता आहे म्हणून होत नाही हे लक्षात घ्यायला हवे. यानिम्मिताने अजून एक किस्सा आठवतो,  एकदा रिक्षातून प्रवास  करताना आनंदवल्ली या सेनेचा बालेकिल्ला  किल्ला असणार्या गावातील नगरसेवकाची लोकांचे प्रश्न सोडविण्याविषयीची कमालीची अनास्था आणि निराशा दिसून आली. गणपतीउत्सवात फक्त ‘गाणे आणि नाचणे’ एवढेच लोकांना आवडते असे भारी गैरसमज या व्यक्तीचा झालेला आहे. या सर्व गोष्टींचा नीट विचार शिवभक्त सामान्य नागरिक निश्चितच करतील. आणि तेव्हा पक्षाध्यक्ष यांना माझे म्हणणे पटलेले असेल. शिवसेनेकडे खंबीर नेतृत्व नाही आणि लोकहित बघण्याची दृष्टीही नाही. मग नजरेचा आभाव असणारा आंधळा पक्ष जनता का स्वीकारेल ? महायुतीतील इतर लहान-सहान पक्षांपेक्षा अस्तित्वाकरिता मोठी झुंज येत्या काळात सेनेला द्यावी लागणार आहे हे मात्र उघड गुपित आहे. 
     
नाशिक शहराच्या ताळेबंदात आता नोंद रुजवायची वेळ आलीये ती अभिमानास्पद अशा एकुलत्या एक एक्क्याची. संपूर्ण चांदा ते बांदा ज्याचा बोलबाला झालाय असे एकच नाव आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी, यांचे नाव सगळ्यांच्या गळ्यातले ताईत का बनले ? हे पुढे स्पष्ट करेन मात्र तत्पूर्वी, नाशकात भाजप या पक्षाबद्दल कमी परंतु मोदींबद्दल आदरभाव जास्त असल्याचे दिसून आले. निष्कर्ष असा निघतोय की तळागळातला, मोलमजुरी करून पोट भरणारा गरीब हा आज मोदी या असामीच्यासोबत जाऊ इच्छित आहे. मोदी यांनी देशाला दाखवलेली स्वप्नांची लाट(गळ्यातला ताईत!) तशीच कायम आहे. भलेही युतीचे खासदार म्हणून निवडून गेलेले हेमंत गोडसे नाशिककरांचे प्रश्न मांडू शकत नसले तरी मोदी सरकार यावे याकरिता दिलेल्या शर्थीने ते आज सरकार दरबारी विराजमान झालेत. असे असून देखील विधानसभेतही नाशिककरांची पसंती ही मोदी यांना म्हणजेच भाजपला असणार आहे. मोदी  सरकार त्यांच्या कारकिर्दीत देशाचा विकास करतील असे बर्याचं मोठ्या प्रमाणात लोकांना वाटते, पानवाला दुकानदार असो, कापड व्यापारी असो, कामगार असो वा तरुण कॉलेजचा विद्यार्थी असो, नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप जर राज्यात आले तर राज्याचाही देशासोबत विकास घडून येईल अशी जनमानसात प्रतिमा झाली आहे. केंद्रात भाजप व राज्यातही भाजप त्यामुळे जाहीर झालेल्या अर्थयोजना राबवून घेण्यात महाराष्ट्र अग्रेसर ठरेन अशी सर्वांची धारणा आहे. आतापर्यंतच्या शंभर दिवसात किती नेक-अनेक कामे झाली आणि ती खरंच गरजेची होती का ? हे प्रत्येकाने विवेकाने ठरवावे मात्र त्याचा आणि येणाऱ्या निवडणुकांच्या परिणामांचा काहीही संबंध प्रस्थापण्यात मजा नाही कारण लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका वेगळ्या असून त्यात बरंच फरक असतो असे सांगणारे पुष्कळ लोक नाशिकमध्ये आहे. जपानशी संधान जोडल्याने पुन्हा कदाचित जपान महासत्ता बनू शकेल, आजवर जपानकडून चांगलेच संबंध बांधले असल्याने आपला भारत देशही प्रगत राष्ट्र म्हणून उदयास येईलही. अणुकरार आणि काही बाबींचा विचार मोदीजी करत नाहीये याचा परिणाम विरोधकांच्या हाती कोलीत दिल्याप्रमाणे होईल, अशाच पद्धतीने उणेअधिक इतरही वेगळे विषय ज्याला ज्याला म्हणून मोदी सरांनी हात घातलाय आणि ज्याप्रकारची शासनप्रणाली ते राबवताय ते आणि येणारा काळ यावर खडे भाष्य करण्याचे सामर्थ्य दाखवेल.. ते दाखवेल, होईल तेव्हा होईल तूर्तास पुन्हा नाशिकच्या वार्यांकडे येवूया.

 नाशिकची जनता जनार्दन यंदाची दिवाळी भाजप सरकार आणि मोदी यांच्यासमवेत आनंदाने साजरी करणार हे स्पष्ट आहे. निवडणुकांचा बिगुल वाजला आहेच. महाराष्ट्रात प्रचार रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांची दांडिया महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी त्याची मज्जा लुटा, आणि सर्वच पक्षांना येणारा काळ चांगला जावो याच शुभेच्छा.    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका