विशेष प्रतिनधी , नाशिक 02-08-2014
व्यक्तिगत असो वा सार्वजनिक सोशल मीडियामुळे आज प्रत्येक नेटीझन्सच्या आयुष्यावर थोडा-बहुत परिणाम हा होतोच आहे. चांगल्या परिणामांपुढे वाईट परिणाम हे कमी पण अत्यंत गंभीर असे असतात आणि याकारणामुळेच सोशल मीडिया फक्त बदनाम होत आलाय. परंतू साहित्य क्षेत्राला सोशल मीडिया खूप मोठे व्यासपीठ म्हणून उपलब्ध झालंय. आजकाळात सर्वदूर टीव्ही पोहोचलेत परंतू भारनियमनामुळे वीजप्रवाह सुरळीत नसतो अशा वेळी बातम्यांकरिता सोशल मीडिया हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.लेख,पुस्तके,कविता,पाककृती,प्रबंध अनेक अनेक ज्ञाताद्न्यात गोष्टींचे सोशल मीडियावर संघटन आणि प्रसारण होत आहे.आजाकाळात अनेक वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या यांनी आपापली सोशल दालनेही खुली केली आहेत, त्यावरून दिवस रात्र फक्त बातम्यांचा ओघ सुरु असतो. आता पुन्हा सांगतो बातमी म्हटलं की चांगलं-वाईट सगळंच आलं आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते सोशल मीडिया हा जितका आपल्याला आपणच दिलेला आशीर्वाद आहे, आणि तितकाच फुंकलेला श्रापसुद्धा. सोशल मीडिया कोण कशा पद्धतीने वापरतो यावरच तो चांगला कि वाईट हे अवलंबून आहे, इतर सर्व गोष्टीप्रमाणे हे ही तंत्रज्ञान आहे ते कधीच अधोगतीकडे नेणार नाही पण आपण त्यातली उपयुक्तता कोणत्या रूपकात पाहतो ते महत्वाचे आहे आपल्याला चांगली माहिती प्रसारित करायची आहे की दंगे घडवून आणायचे आहे ते जास्त महत्वाचे आहे. अनेक युवक तसेच प्रौढ वर्गातील लोक एकत्र येत समाजपयोगी कार्ये देखील करतात. ही बाब अभिमानस्पद आहे.
सोशल मीडियाची उपहासात्मक व्याख्या अशी होईल, सोसायला लावणारा मीडिया. गम्मत म्हणून जरी असे म्हटलं गेलं असलं तरी त्यात लपलेल्या अर्थाकडे आपण लक्ष दिलेच पाहिजे. सोशल मीडियामुळे अनेकांना मग व्यक्ती असो व संस्था असो प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व इथे लाभते तसेच अभिव्यक्तीत्वाचे लाड विनाअडथळा इथे पुरवता येतात आणि म्हणूनच आज समाजात बर्या-वाईट गोष्टीं फार व्यापक स्वरूप धारण करतात त्यात मग पराचा कावळा होतो, जरासी उडालेली धूळ वादळी बनते. मला एवढेच सांगायचं कि सोशल मीडिया हा मुळीच उपद्रवी नाही, पण जर ठरवलं तर अत्यंत जहाल असे अस्त्र आहे. तर सोशल मीडिया म्हणजे, एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे व्यासपीठ , मानवनिर्मित तारांनी बांधलेलं अस्त्र, किंवा एक प्रबोधनात्मक आणि परिणामकारक क्रांतीचे प्रतिक. आता आपण पुस्तकी व्याखेकडे जाऊया , सोशल मीडिया म्हणजे लोकांचे एकत्रीकरण, लोकांचे एकत्र जागतिक पातळीवर एकत्र जमून विचार ,कल्पना यांची देवाणघेवाण करणे किंवा नवे विचार ,कल्पना, कलाकृती, अशा विविध नवनिर्मिती करणे. ही व्याख्या एवढीच असू शकत नाही तिला अनेक आयाम आहेत , सोशल मीडिया या संकल्पनेचे खूप पैलू आहे. वर उल्लेख केला तसेच सोशल मीडियाचा जसा आपण वापर करू तशाच त्याच्या नवनव्या व्याख्या जन्म घेत जातात.
खरंच सोशल मीडिया फक्त म्हणण्यापुरता चांगला आहे की खरंच त्याचे चांगले फलित आहे? पण आज अनेक अनेक चांगल्या संस्था अशा आहेत ज्या शिक्षण क्षेत्रात आहे त्यांना फार उपयोगी ठरलाय हाच आपला सोशल मीडिया, इंटरनेटच्या सहाय्याने शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे त्यात भारत आणि इतर पाश्चिमात्य देशांचा समावेश होतो. दूरदूरून रोज लाखो विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत, ते याच सोशल मीडियामुळेच ना ! मागे मी वाचले होते की फेसबुकमुळे हरवलेला भाऊ, एकमेकांना भेटले, हा चमत्कार घडवणारा सोशल मीडिया कोणालाही आयुष्यात वरदानच वाटावा . सोशल मीडियाचा अजून एक मोठा फायदा म्हणजे ओळख ! ओळख निर्माण होते, अनेक ओळखी होतात, नवीन लोक भेटतात,मला तर इथे अनेक सेलेब्रिटी, शास्त्रज्ञ,डॉक्टर्स,गायक,कवी,मानसोपचारतज्ञ असे नानाकळा आणि बहुढंगी,बहुरंगी छटा असलेले व्यक्तिमत्व भेटतात, इथे तुमचे गुणगान गायले जाते, इथे तुमच्यावर टीकाही केली जाते. स्वतःच्या आणि समाजाच्या सुधारणेस, परिवर्तनास आज घडीला सोशल मीडियासारखे प्रभावशाली माध्यम नाही. हो मी अत्यंत गंभीरपणे हे विधान केलंय ,याला कारण इतर माध्यमांची ताकद हळूहळू क्षीण होत जातेय. आणि म्हणूनच सोशल मीडियाला अच्छे दिन आले आहेत . आज एमपीएससी, युपीएससी, रेल्वे ,बँका यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन हे सोशल मीडियामार्फत वाजवी किंमतीत उपलब्ध होते जो तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व असा आविष्कारच आहे ,जो त्याचा योग्य वापर करेन त्याच्या आयुष्याची सार्थकता अवर्नानियचं ठरावी.पुरुष आणि महिला या समाजाच्या मुख्य घटक आज सोशल मीडियावर या दोन्ही घटकांनी एकत्रित येवून समाजाचा वैचारिक, बौद्धिक,अध्यात्मिक असा सर्वच बाबींनी महाराष्ट्राला,देशाला समृध्द केलंय. आज अनेकांचे अर्धे आकाश असलेल्या सोशल मीडियाला अनेक परिसाचा स्पर्श लाभून सोन्यासारख्या लखलखत्या व्यक्तिमत्व तयार झालीत, हे अजिबात दुर्लक्षिण्यासारखे नाही
पण त्याच बरोबर सोशल मीडियाची दुसरी बाजू बघितलीच गेली पाहिजे. नक्कीच ती म्हणजे वाईट बाजू. सोशल मीडियामुळे घडलेली हिंसा, अत्याचार,आतंकवादाला पुष्टी देणाऱ्या घटना या खरोखरच क्लेशकारक आहेत. सोशल मीडियाचे हे वाईट घटकांचे जाळे एवढे फोफावलयं की लोकांचा बळी पाडला जातोय तो ही नाहक ! कोणतीही चूक नसताना. हे वेदनादायी भीषण वास्तव आहे, आणि आता हेच वास्तव आपल्या संपूर्ण जगण्याचाच एक भाग बनलंय. सोशल मीडियावरून केलेली मैत्री घातक ठरू पाहतेय. कित्येक मुलामुलींचे संसार ,लग्न, मैत्री, प्रेम हे वास्तव जीवनात उध्वस्त होत आहे.ही किमयाही सोशल मीडियाचीच, भयानक आहे ,हे सगळंच अक्षरशः भयानक आहे. परंतू याहीपेक्षा भयंकर चित्र आपण पुढच्या परिच्छेदात वाचाल.
लोक कलुषित होत आहे,दुषित होत चाललीये लोकांची मनोवृत्ती , आपलेपणा ही वाढलाय त्याप्रमाणे द्वेष करणे ही वाढलंय ,इर्षा, मत्सर या मानवी मनाच्या भावना बळावत चालल्या आहेत. का कशासाठी ? आभासी जगातल्या क्षणभंगुर प्रसिद्धीपायी लोक सरळ सरळ अतातायीपणा करतात, काहीजण तर नातंच तोडायला पाहतात, लाईक आणि कमेंट दिली नाही ,विरोधात कमेंट केली तर लाज वाटावी आणि किळस यावी इतक्या खालच्या थरावर उतरून बोलायला ही मागे-पुढे पाहत नाही. स्त्रिया तर सगळ्यात वाईट, खरोखर काही पुरुष आणि बायका बेभान वागतात सोशल मीडियावर, मुली तर असतात चला अल्लड,समाजास्पण प्रत्येकीत नसतो कधी तो कमी असतो,पण आयुष्यात स्थिरावलेल्या बायकाही सोशल मीडियावर लोफरगिरी करताना दिसतात हे एक कटू सत्य आहेत. अर्थात अनेक महिलांनी याचा वापर करून चळवळी उभ्या केल्या,खेडोपाडी महिलांच्या समस्यांवर एकत्र जमत कायमस्वरूपी त्यांना शिक्षण, आरोग्य आणि समान अधिकारांकारिता झटापट केली. स्त्रियांना निर्भयपणे जगता यावे यासाठी मानसिकता बदलण्याकरिता सोशल मीडियाचा थेट उपयोग केला जातो. अक्कल गहान ठेवून सोशल मीडिया वापरायचा नसतो, पण स्वातंत्र मिळालं म्हटल्यावर मुक्तपणे स्वैराचार केलाच नाही तर ती मानवजात कसली ? स्त्री काय पुरुष काय, आणि एक सोशल मीडियावर खोटेपण करायचा प्रकार आढळतो, चिक्कार मुली मुलांच्या नावाने अकौंट उघडतात आणि प्रमाणाच्या बाहेर अनेक मुलांचे मुलींच्या नावाने अकौंट असतात. बर्याचदा जे लैंगिक गोष्टींच्या आहारी गेलेले षंढ आहेत अशाच लोकांमध्ये हा विकार अस्तित्वात दिसतो. या अशा अकौंट वरून व्यभिचारी मजकूर वा छायाचित्र, चित्रफिती प्रसारित केल्या जातात अविरत त्यांना प्रतिसादही मिळत असतो. हा सोशल मीडियाचा बाष्कळ वापर करणार्यांना थांबविणे,अडविणे खरोखर जिकरीचे आहे परंतु ते काही केल्या थांबत नाही त्यामुळे इतर लोकांच्या सुप्त भावनांना आपोआपच अग्नी मिळतो, ते लोक चेकाळतात मग अत्याचार ,बलात्कार,खून इत्यादी गुन्हे घडतात.
सोशल मीडियावर बहुतांश प्रमाणात आपण आपली खरी माहिती उघड केलेली असते, आता तर नोकरी देण्यापूर्वी सोशल साईटवरील स्टेटस पाहूनच देतात म्हणे ! हरकत नाही पण दुसरीकडे पहा , अमेरिकेने काय कमाल केलीये, अमेरिकेचे खूप गुप्तहेर हे अशा सोशल सर्विस देणाऱ्या कंपन्यात काम करतात त्यामुळे सोशल होऊन आपण जे काय उद्योग, प्रताप, उपक्रम,योजना राबवीत जातो ते सर्व अमेरिकेला कळते अगदी इत्यंभूत माहिती अमेरिकेकडे जमा होत राहते. उद्या म्हटलं तर अमेरिका अख्ख जग लुटू शकते, संपवू शकते किंवा थोड्याफार फार प्रमाणत जगावर वर्चस्व प्रस्थापित करू शकते. पण भवताली परिस्थिती अशी झालीये, अशी दलदल निर्माण झालीये कि व्यक्तिगत माहिती हि उघड करावीच लागते त्याशिवाय या आभासी जगात तुम्ही प्रवेशसुद्धा करू शकत नाही. अमेरिकेची ताकद सार्या जगानेच दुर्बुद्ध आणि लुब्ध होऊन जात वाढवून दिलीये. हे सर्वस्वी शक्य झाले ते म्हणजे सोशल मीडिया. अमेरिका कोणत्याही काळात फक्त विनाशाकरिता लष्कर यंत्रणा राखून असलेला देश आहे, त्याच्याशी लढणे खूप मुश्कील बनलंय.
भारतात या वर्षात जी काही सोशल क्रांती घडून आली तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तरी परंतु आपण एकदा त्यावरही कटाक्ष टाकूया. शब्दांच्या जोरावर पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडून आला, संघर्ष केल्याविना मोदी जिंकण्याला कॉंग्रेसने निर्माण केलेली अनास्थ अवस्था जबाबदार होतीच पण जबरदस्त घात होता तो या सोशल मीडियाचा, पाहिले शब्दांची कमाल काय उंची गाठू शकते ते पण तरीही मायबोली मराठीचा सोशल मीडियावर वापर करणे अनेकांना लाजिरवाणे वाटते, शुद्ध लेखन करणे कमीपणाचे वाटते, आणि काही महाभाग तर स्वतःच्या चूका झाकण्यात दिल्ली जिंकल्याचा आव आणतात चिडतात .अशा प्रकारचा मूर्खपणा, बावळटपणा एखाद्याच्या रक्तात भिनवायलाही सोशल मीडियाच जबाबदार आहे. तसेच सोशल मीडियाचा अजून एक तोटा म्हणजे माणसाशी माणूस बोलेणासा झालाय ,बापाला मोबाईलवर चाट करायला वेळ आहे पण मुली सोबत दोन शब्द प्रेमाचे हे बोलणार नाही ,आयांचेही तसेच युट्युबवर व्हिडीओ पाहण्यात भाजी करपते तिकडे लक्ष नाही, सगळ्यांचेच रोज मित्रांना भेटणे नाही ,कार्यक्रमांशिवाय नातेवाईकांकडे जाणे पण लोकांचे कमी झालंय, जग जवळ येताना माणसे एकमेकांशी दुरावालीत हे जळजळीत सत्य आहे. मैत्री आणि प्रेम या भावना तर एखाद्या खेळण्याप्रमाणे समजतात सोशल मीडियावर ,कुणीही मनाशी खेळते ,कुणीही कुणाच्या मनाला अगदी सहज दुखावते. या सर्व हानीलाही सोशल मीडिया कारणीभूत आहे.
तेव्हा समारोपात इतकेच सांगेल कि शक्य तितका कमीच सोशल मीडिया वापरलेला योग्य राहील , यावर चांगल्या गोष्टी अनेक घडतील, वाईटही कोणी रोखू शकत नाही पण आपल्या हातात आहे ते फक्त धकाधकीच्या,धावपळीच्या रहाटगाड्यातून निर्भेळ आनंद शोधणे. आणि तो सोशल मीडियात मिळतोच.आणि ओघाने मागे मागे येणाऱ्या इतर सर्व घटना, गोष्टी या टाळू शकता न येणाऱ्या असल्याने बौद्धिक आणि भावनिक आणि वैचारिक संमिश्र क्रियांच्या निष्पत्तीला सामोरे जाण्याची कला अवगत करणे हे आवश्यक आहे...!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा