आपण प्रत्येकचजण रोज ठराविकच आयुष्य जगत असतो. आठवड्याचे सातही दिवस, ठरवून एकसारखंच सगळं करत असतो, मात्र थकून रात्री जेव्हा निजतो काय तेव्हा एकदातरी चुकून आपल्याला वाटते का, आजचा दिवस खरंच आनंदाचा होता, सुखाचा होता; बर्याच लोकांना वाटत असेलही, दिवस किंवा काही तास आनंदाचे असतीलही पण तरीही जीवन हे सुसूत्रबद्ध असे नि एकाचं ढाच्यात अडकून बसल्याने मला वाटते आयुष्याची वाताहत व्हायला सुरुवात झाली आहे किंबहुना आपणच त्याला आरंभ दिला आहे.
काळ पुढे गेला, तसा माणूस हा प्राणी हुशार होत गेला, त्याचा टप्याटप्याने विकास होत राहीला, पुढेही गतीने तो होत जाईलच मात्र या सगळ्यांत, माणसांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता व्यावहारीक स्पर्धा करायला सुरुवात केली, पुढे असणार्यांच्या आणखीन पुढे मला कसे जाता येईल यावरच सतत विचार करायला शिकला. घड्याळाची काटे नियती बनून नाचवू लागली, वेळ मर्यादेचे भान सगळ्यांना ठावूक झाल्याने माणसाला माणसाची किंमत राहिली नाही. माणुसकी ही भावना आणि सार्या संवेदना वेळ प्रसंगी गोठवून टाकल्या जातात. या शहरीकरणात शेजारी कोण राहते हे ठावूक नसते परंतु फेसबूकवर मात्र पाच हजार मित्र असतात, हे काय आहे? निव्वळ माध्यमांचे आक्रमण आहे का ? तर त्याहीपलीकडे आपणच आपल्या आयुष्याची ठरवून केलेली वाताहत नाही का ? आई आपलं तान्ह बाळ रडत असताना मैत्रिणीशी फोनवर बोलत असते . किंवा एका बापाने फेसबुकवर चाट करणे एवढे महत्वाचे असते का ? म्हणजे माणूस चुकताना एकटा चुकतो पण दरवेळेस त्याचा परिणाम फक्त त्यालाच नाही तर दुसर्यांना देखील भोगावा लागतो. ही जीवनाची वाताहत नव्हे तर आणखी काय आहे ?
जी मूल्ये आपल्या पूर्वजांनी जपली होती, ज्या महापुरुषांचे आपण वंशज असल्याचा गर्व बाळगतो त्यांच्या आयुष्याच्या खरंच जगण्याचा दृष्टीकोन ठेवतो का ? जिद्द, कष्ट, मेहनत न घेता सगळंच आयते लाटण्याच्या अपप्रवृत्तीची जोपासना झाल्याने जीवनाची नासधूस केली गेली. भोवताली घडणाऱ्या घटना आणि तिच्या घटकांचा सुक्ष्म अभ्यास केल्यानंतरचा हा निष्कर्ष आहे. सुन्न करणाऱ्या घटना आहेत, सगळीकडे हेच, असंच चित्र दिसतंय, जो तो अडकलेला, धावतोय,धावतोय, धावत जातोय पण का? या धावण्याचा परामर्श तो काय, कशात आहे? यातून काय मिळतंय ? म्हटलं तर खूप काही म्हटलं तर काहीच नाही. आज प्रत्येक दिवसाचा शेवट करताना हटकून हाच एक विचार येतोच मी जे करतोय तेच मला करायचे होते का? माझे ध्येय मला सध्या होतंय का ? बस, एवढाच विचार केला जातो आणि पुन्हा चालु होते त्या ध्येयनिश्चीतीकडे धावाधाव अगदी फास्ट एक्स्प्रेस सारखी. एक वेळ मान्य करूया, नको कायमसाठी मान्यंच करूया की असे असे वागणे हेच योग्य आहे. परंतु यातून होणारे परिणाम काय आहेत याचा विचार झालाय का ? प्रामुख्याने दिसून आलेला परिणाम म्हणजे या सर्व राहटगाड्यात संस्कारांची पायमल्ली होणे. माणूस विसरूनच चाललाय की शेवटी तो एक माणूस आहे. मानवाची विसरण्याची पातळी एवढी खोल चालले गेली की निसर्गालाच त्याने आव्हान दिलंय आणि माळीण, उत्तराखंड या सारख्या ठिकाणी निसर्गानेही अवकळा करत प्रत्युत्तर केलंय. विशीन्न होऊन बोलावेसे वाटतंय, निसटत चाललंय सुखी आणि समाधानी जीवन, जीवनाच्या वाताहातीला जबाबदार आहेत संस्कारांचे घातपात.
‘घातपात’ हा शब्द तसा अंगांवर येणारा, तो उच्चारता क्षणी त्याची भीषणता मनाला चटका लावून जाते. मग संस्कारांचे घातपात, असं काही ऐकावे तर आभाळच कोसळल्यासारखे होईल. पण ते खरंय, दुर्दैवाने ! याची सुरुवात कुठून झाली ? हा फार संशोधनांचा मुद्दा नको विचारत घ्यायला, पण हे असे घडलं आहे. आईची मॉम झाली तेव्हापासून, बाबांचा डॅडा झाला तेव्हापासून, आणि अशीच लांबचलांब यादी होईल, जी बदल,प्रगती यांच्या सोबत समांतर वाढलेली आहे. आमच्या शेजारचा सहा वर्षाचा मुलगा त्याच्या बहिणीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतो, त्याच्या वडिलांकडून त्याने ती ऐकलेली असते. बालवाडीत शिकणारी मुलेसुद्धा एकमेकांत असल्याच अर्वाच्च प्रकारच्या शिव्या देत असतात, हे चित्र तर अगदीच सामान्य आहे. कुणी काही यावर गंभीरतेने पाहत नाही, ‘काळ बदलतोय’ असं गोंडस नाव देवून या गोष्टी दुर्लक्षल्या जातात. एकदा सहज अगदी सहज म्हणून मी माझ्या सहावीत शिकणाऱ्या भावाच्या गळ्यात हात घातला, त्यां नंतर तो जे काही बोलला त्याने अक्षरशः हादरवून सोडले, माझा हात त्याच्या छातीपर्यंत पोहोचत होता अन त्याने चक्क विचारले “ दादा , हे काय चालु आहे ? आणि मी खात्रीने सांगून शकतो या गोष्टी कुठलंच कुटुंब मुलांना घरी शिकवत नाही , कुठून कळते त्यांना मग ? आला मुद्दा प्रगतीचा आणि शाळेचा. हो कॉम्पयुटर, इंटरनेट आणि वाट भरकटलेले मित्र यातून हे सर्व संस्कार कोवळ्या मुलांच्या मनावर घडतात आणि मग हा मानवाच्या पौगंडावस्थेतला पहिला घातपात ठरतो. लहानपणापासून आईवडील, शाळा,पुस्तके, स्तोत्रे, प्रार्थना या सगळ्या गोष्टी मेंदू लांब कुठेतरी सरकवून देतो आणि नव्या वाईट का असेना पण गोष्टी सगळ्या स्वीकारतो. म्हणूनच जरी १३-१४ वर्षाचे मुलाचे फेसबुक असले तरी त्यात अश्लील मजकूर, चित्रे सर्रास आढळतात. चांगलं ऐकलेलं, वाचलेलं विसरले जाते.
हे झालं फक्त मुलांच्या बाबतीत तरुण आणि पुढील आयुवर्गातही असेच चित्र आहे. दिवस इंटरनेटशी पहिले कनेक्ट होतो मग घरच्यांशी तो जोडला जातो, कितीतरी मुलं-मुली व्हॉटस एप वर चाट करत तासनतास घालवतात, पण शेजारच्या मित्राला मात्र क्षणभरही विचारत नाही, आभासी दुनियेत भेटणारा तुम्हाला महत्वाचा आणि जिवंत व्यक्ती मात्र कवडीमोल, हे अती होतंय नाही ?कुणीतरी आपल्यासाठी जीव काढतंय,कुणी उभं राहिलंय आणि आपण मात्र ढिम्म, त्याच्याकडे पाहत पण नाही. ‘कुणीतरी’ या व्याखेत एकवेळ मित्र-मैत्रिणी असत्या तर ठीक होते, पण आता आई-वडील, भाऊ-बहिण, काका-काकू, मामा-मामी इतकंच काय तर डॉक्टर आणि वकीलसुद्धा आपल्याला ‘कुणीतरी’ वाटत असतील तर दिढमूढ होऊन विचार करायला हवा प्रत्येकाने अतिशय गंभीर समस्या आहे ही. अनेक लोकांच्या बाबतीत म्हटले जाते ‘हे सगळे यांच्या मातीतलेच संस्कार आहे’ माती या एका शब्दात सगळंच समाविष्ट होते, म्हणजे घर, समाज, शाळा अगदी सगळचं. संस्कार काय कुणी जादूचा दिवा घासून, जिनीकरवी करून घेत नाही किंवा गोळ्या खावूनही संस्कार येत नाही. संस्कार भोवतालच्या वातावरणातून बिंबवले जातात. म्हणूनच पिढी कोणत्या वातावरणात वाढते त्यावरून तिचे संस्कार ठरतात संस्कारांचे घातपात असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अनेक कारणे सापडतील जे या कारवायांचे निदर्शक बनतील. सकाळपासून सुरवात केली वर म्हटल्याप्रमाणे सोशिक भावनेचा विस्तारलेला अनुप्रास त्यातून इतरांना होणारा त्रास, रोजची धावपळ करताना कोणी पडतंय, कोणी रडतंय, कोणी याचना करतंय या सर्वांकडे घडणारे याकडे खरंच कुणालाच घेणे देणे नाही. संस्कारांचे घातपात या विषयाला तसा अजून एक पैलू आहे तो म्हणजे गुन्हेगारी ती एक तर पिढीजात आहे म्हणजे गुन्हेगारीच्या विश्वात वाढलेली व्यक्ती मंदिरात ध्यान लावून तर बसणार नाही, तिथे लुटालूट मात्र करेल. फार मोठ्या गुन्ह्यांकडे जाण्यापेक्षा आज दिवसाला किमान पाच आणि जास्तीती जास्त वीस महिलांच्या पोटी या मोटारसायकलवरून खेचल्या जातात, आणि हे प्रत्येक शहरात दिसते, यात अगदी हालाखीत जगणारे नाही तर उच्चभ्रू वस्तीतले युवक आहेत. केवढं भयानक चित्र तयार झालंय समाजात. आजकाल अपघात झाला तर पटकन आधार द्यायलाही पुढे येत नाही, कायदा जरासा महिलांच्या बाजूने झुकले गेल्याने पुरुषांना फसवण्याचे, दमदाटी करण्याचे प्रकार वाढलेत. तक्रार घेवून पोलीस ठाण्यात जावे तर संशय पहिले फिर्यादीवर घेतात, अगदी १०० नंबरवर फोन केला तर ‘आम्ही बघून घेऊ तू घटनेपासून लांब जा’ असे टोलवून देतात. भ्रष्टाचाराबद्दल तर काही बोलयलाच नको, कमाई करण्यापेक्षा खाण्याचीच घाई जास्त, या भ्रष्टाचारी युगात दाम्यासारखा एक सज्जन माणूस कसा मार खातो हे आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे. जनतेची सत्ता लाटण्याकरिता जीवाचा आटापिटा करतात अन मग जनतेच्या उरावर बसतात. ही सगळी लक्षणं शेवटी कशाची म्हणावी संस्कारांची तुटलेली नाळच आहे ना ही. महाराष्ट्रात, भारतात आपण जगतो, महाराष्ट्र जात आणि भारतीय धर्म असे लोकशाही तत्वाने का नाही मग जगत ? का जातीतेढावरून नितीन आगे सारख्या दलित मुलाचा बळी जातो. आता सांगा, हे काय आहे ? कोणत्या पुराणात, बायबलात, कुराणात लिहिलंय, कुठेच नाही हा मानवी घातपात आहे. चुकीच्या समजुतींचा मारा आहे. जो संस्कारांच्या गोळीतून केला जातो. मुद्दाम एक चौकट आखून देवून, झापड लावल्या घोड्याप्रमाणे बघायला शिकवले जाते, माल वाटते हा खूप मोठा वार आहे संस्कारांवर, खूप भयावह, हिंसात्मक असा संस्कारांचा घातपात.
माझ्या लेखाच्या मांडणीवरुन, निरीक्षक आणि चौकस बुद्धीजीवीच्या नेमकं लक्षात येईल, एव्हाना आलं असेल, पण सामान्य वाचकांचा विचार हा झालाच पाहिजे, किमान मला तरी कलेने दिलेला हा संस्कार आहे. सांगण्याचा मतितार्थ हाच की प्रथम मी म्हटल्यानुसार जीवनाची वाताहत झाली आणि ती का तर संस्कारांचे घातपात यामुळेच. निखळता, निर्मळता झरा, नदी आपण अडवून तिचे बंधारे बांधायला लागलो, प्रत्येकच बाबींचा उपयोग स्वार्थासाठी करायला लागलो आणि मग तो काळ,प्रवाह हा प्रदूषित झाला, त्यात कचरा आला, नितळता सगळ्याच गोष्टीतून नाहीशी होत गेली. आणि मुख्य म्हणजे सारासार विचार केला तर असे ध्यानी येते कि याला कारण आहे बदलेले आदर्श रयतेची कणव असलेला राजा शिवाजी एकंच झाला, दलितबांधवांसाठी, आणि सर्वच जातीच्या लोकांकरिता हक्क, न्याय, शिक्षण,अन्न, निवारा,सुरक्षा, समता यांकरिता लढणारे फुले-शाहू-आंबेडकर पुन्हा कधी झालेच नाही. आज आपण काय करतो, कृष्णाच्या लीला म्हणून दहा-दहा थर रचून मटक्या फोडतो आणि जीवाशी खेळ करतो, प्रत्येक सण हा फेस्टिवल म्हणून साजरा करतो मग त्याच्या वर्गणी पासून ते हिरोईन नाचवेपर्यंत सगळ्याच गोष्टींत अमर्याद पैसा, अन्न, पाणी आणि साधनसंपत्ती यांची उधळपट्टी करतो, बिनधास्त ! याकरिता म्हणून वरती राजकीय वरदहस्त असतोच, निवडून सत्तेवर बसणाऱ्या मदमस्त, मस्तवाल पुढारी तरुणाच्या शक्तीचा उपयोग करून घेतात, तीच शक्ती देश एकोपा, युद्धबंदी आणि रोजगार देवून देश घडवण्यात लागली तर !! आता हे नुसते प्रश्न झाले पण हे सर्व का ? कसे असे ही आपसूक मनात येते आणि मलाही ते सांगायचे आहे. अनेक कारणांपैकी एक म्हणजे दुनियेचे आदर्श बदलले.
नवनवीन आदर्शांचे उल्कापात घडू लागल्यामुळे त्यांच्या सगळंच बिनसत जाऊ लागलंय. सिनेमातले नट नट्या आताच्या पिढीला आदर्श वाटतात, जाहिरातीत ते मुलींना छेडताना, दारू-सिगारेट, तंबाखू खाताना दाखवले जातात, आणि हे असले घातक रसायने थोपवले जातात. एक खूप चांगले लेखक आहे तुषार नातू ते असे म्हणतात की दारूचा पहिला ग्लास हा खूप मस्त अनुभव असतो आणि तो पाजणारा मित्र तेव्हापासून आपला आदर्श बनतो. कुठे, कुठे वाहत चाललंय हे सगळे ? शिवजयंती, भीमजयंती साजरी करताना रात्री दहा वाजेनंतर अश्लील गाण्यांवर तर्र होऊन नाचतात आजकालची मुलं, तेच महापुरुषांचा आदर्श ठेवून एखादे कार्यसिद्धीस कोणी का नेत नाही, सारखीच परिस्थिती लग्न सारख्या कार्यांची आहे.
आज समाजात समाजाकरिता म्हणून काम करणारे प्रसिद्धीस का पावत नाही, एखादेच अण्णा हजारे सोडले तर ! सत्यमेव जयतेतून एक आदर्शवाद प्रस्थापित करणारा, मैदानात रोमहर्षक खेळ करून दाखवणारा गळ्यातला ताईत असणारा, पडद्यावर उड्या घेत, नटीच्या, नको शोभेच्या बाहुलीला पाहिजे तसे कुरवाळणारा आपल्याला आदर्श का झालाय ? का बाबा आमटेसम व्यक्ती ज्या खर्या अर्थाने आदर्श आहे,त्यांच्या विचारांची पायमल्ली होतेय. झोपडीत राहून, काम करून, जिद्दीने परीक्षेत घवघवीत यश संपादित करणारा आदर्श का ठरत नाहीये आजच्या पिढीचा काळाचा ? भारत देश कुठे होता आणि आज कुठे नेला जातोय . पिढीला दोष देण्यापूर्वी पालक किती जागृत आहे, सजग आहेत ? त्यांचे खरंच त्यांच्या मुलांकडे लक्ष आहे की फक्त ग्रुपमध्ये काय शिजतंय याकडेच आहे, चित्रपट, कथा, पुस्तके, कादंबर्या, वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे यांतून नेमका कशाचा पायंडा पाडला जातोय यावर विजीगिषु होऊन कारणमीमांसा करून विचार करावा लागेल, आज कुणी नाही केला तरी एकदिवस सर्वच नष्ट होत जाईल अन मग ह्या लेखा मागचा उद्देश जो की सर्वांनी स्वतः बाबतीत आणि एकंदर समाज चित्र बाबीत अंतर्मुख होऊन विचार करावा आणि किमान एका व्यक्तीने तरी असे ठरवावे मी माझ्यावर झाल्या चांगल्या संस्कारांचे आदर्श मनात बाळगून जगेल तर आणि तरंच मला वाटते एका जीवनाची तरी वाताहत थांबेल.
समाप्त
विशाल लोणारी
नाशिक , ९५२७१३८५०५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा